नवी दिल्ली, 10 डिसेंबर : जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया साईट फेसबुक (Facebook) अनेकदा काही ना काही कारणाने वादात असते. कधी डेटा लीक प्रकरण, तर कर कधी राजकीय पक्षाला सपोर्ट करण्याचे आरोप फेसबुकवर लावले गेले आहेत. आता पुन्हा एकदा फेसबुक कंपनी वादात अडकली आहे. अमेरिकेतील अनेक राज्य फेसबुकविरोधात एकवटल्याचं चित्र आहे.
न्यूयॉर्क राज्याच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेतील 40 हून अधिक राज्यांच्या समूहाने फेसबुकवर खटला दाखल केला आहे. छोट्या प्रतिस्पर्धींवर एकाधिकार आणण्यासाठी, त्यांना चिरडण्यासाठी बाजारातील ताकदीचा गैरवापर करत असल्याचा आरोप फेसबुकवर करण्यात आला आहे.
या आरोपांनंतर फेडरल ट्रेड कमिशन (FTC)आणि 48 राज्यांच्या अॅटॉर्नी जनरलने बुधवारी कंपनीवर खटला दाखल केला असून कारवाई सुरू करण्यात आली आहे. फेसबुकविरोधात खटला दाखल झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर बाजारात फेसबुकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. फेसबुकवरील खटल्याच्या कारवाई दरम्यान, निकाल फेसबुकविरोधात लागल्यास, फेसबुकला इन्स्टाग्राम(instagram), व्हॉट्सअॅप (whatsapp) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
न्यूयॉर्कच्या अॅटॉर्नी जनरल लेटिया जेम्स यांच्या नेतृत्त्वाखालील द्विपक्षीय आघाडीने असा आरोप केला की, फेसबुकने आपली मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी पद्धतशीर रणनीती तयार केली आहे. आपल्या वर्चस्वाला धोका होण्याआधीच फेसबुक छोट्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचं अधिग्रहण करत असल्याचा आरोपही लावण्यात आला आहे. यात 2012 मध्ये प्रतिस्पर्धी इन्स्टाग्रामचं अधिग्रहण, 2014 मध्ये मोबाईल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचं अधिग्रहण करणं हा या रणनीतीचाच एक भाग असल्याचा आरोप असून सॉफ्टवेअर डेव्हलपर्सवर स्पर्धात्मक अटी लादण्याचाही आरोप करण्यात आला आहे.
फेडरल ट्रेड कमिशनच्या तक्रारीनुसार, फेसबुकच्या या रणनीतीमुळे प्रतिस्पर्धांना तोटा झाला आहे. तसंच ग्राहकांना नेटवर्किंगचे मर्यादित पर्याय राहिले असून जाहिरातींना स्पर्धात्मक फायदा मिळाला नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. परंतु फेसबुकचे उपाध्यक्ष आणि जनरल वकील जेनिफर न्यूस्टेड यांनी या खटल्याला विरोध केला आहे.