• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका

WTC Final : टीम इंडियाला महागात पडल्या या 5 चुका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा न्यूझीलंडने (India vs New Zealand) पराभव केला आहे, यामुळे विराट कोहलीचं (Virat Kohli) आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 23 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा न्यूझीलंडने (India vs New Zealand) पराभव केला आहे, यामुळे विराट कोहलीचं (Virat Kohli) आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाकडून बऱ्याच चुका झाल्या, ज्यामुळे त्यांना पराभवाला तोंड द्यावं लागलं. मॅचच्या राखीव म्हणजेच सहाव्या दिवशी सुरुवातीलाच कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा खराब शॉट मारून आऊट झाले, यानंतर भारताची बॅटिंग गडगडली आणि टीमचा 170 रनवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियाच्या चुका आणि कमकुवत बाजू पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. पुजाराचा फॉर्म टीम इंडियाची भिंत असलेल्या चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Pujara) फॉर्म गेल्या काही काळात कमालीचा ढासळला आहे. याआधीही त्याच्या संथ खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजाराने 54 बॉलमध्ये 8 रन केले. यापैकी दोन बॉलला त्याने फोर मारल्या, म्हणजेच त्याने संपूर्ण इनिंगमध्ये आऊट व्हायच्या आधी 51 बॉलला एकही रन काढली नाही. क्रिकेटमध्ये बॉलरचं रिदम बिघडवण्यासाठी एक-एक रन काढून दुसऱ्या बॅट्समनला स्ट्राईक देणं महत्त्वाचं मानलं जातं, पण पुजाराला पहिल्या इनिंगमध्ये ते करता आलं नाही. तर दुसऱ्या इनिंगमध्ये अखेरच्या दिवशी जेव्हा संथ खेळून मॅचची वाटचाल ड्रॉच्या दिशेने नेणं गरजेचं होतं तेव्हाही पुजाराला मोठी खेळी करता आली नाही. 2019 पासून आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात केली, पण या संपूर्ण स्पर्धेत पुजाराला संघर्ष करावा लागला. ऑगस्ट 2019 पासून पुजाराने 17 टेस्टमध्ये 29.21 च्या सरासरीने फक्त 818 रन केले आहेत. या दरम्यान त्याला एकही शतक करता आलं नाही. तसंच 28 इनिंगमध्ये त्याला फक्त 9 वेळा 50 रनचा आकडा गाठता आला आहे. इंग्लंडमध्ये पुजाराने 9 टेस्टमध्ये 29.41 च्या सरासरीने 500 रन केले. चेतेश्वर पुजाराला यंदा आयपीएल लिलावात चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं, पण त्याला एकाही सामन्यात खेळवलं गेलं नाही. पुजारा जर फॉर्ममध्ये नव्हता तर मग त्याला आयपीएलमध्ये नुसतं बसवून ठेवण्यापेक्षा इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी पाठवता आलं नसतं का? यामुळे त्याला फॉर्म सुधारायलाही मदत झाली असती आणि इंग्लंडमध्ये खेळण्याचा त्याचा सरावही झाला असता. दुसरीकडे टीम इंडियाने हनुमा विहारीला इंग्लंडमध्ये काऊंटी खेळण्यासाठी पाठवलं, पण या महत्त्वाच्या सामन्यात त्याला टीममध्येच घेतलं नाही. कोहलीचा खराब शॉट फायनलच्या अखेरच्या दिवशी पहिला तास सावध खेळण्याची गरज असताना विराट कोहली खराब शॉट मारून आऊट झाला. जेमिसनचा बॉल ऑफ स्टम्पच्या बाहेर असतानाही विराट शॉट खेळायला गेला आणि बॉल त्याच्या बॅटला लागून विकेट कीपरच्या हातात गेला. बीजे वॉटलिंग याने अगदी सहज विराटचा कॅच पकडला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये विराटलादेखील संघर्ष करावा लागला. 2019 साली बांगलादेशविरुद्ध विराट कोहलीने अखेरचं शतक केलं होतं. जडेजाचा रोल काय? इंग्लंडमधल्या वातावरणात दोन स्पिनर घेऊन खेळायचं का नाही? हा प्रश्न आधीपासून उपस्थित होत होता, पण विराटने अश्विन (R Ashwin) आणि जडेजा (Ravindra Jadeja) या दोघांनाही संधी दिली, पण जडेजाला या सामन्यात फार बॉलिंग देण्यात आली नाही. पहिल्या इनिंगमध्ये त्याने 7 ओव्हर आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 8 ओव्हर टाकल्या. जडेजाकडून एवढ्या कमी ओव्हर टाकून घ्यायच्या होत्या मग हनुमा विहारी सारख्या स्पेशलिस्ट बॅट्समनला या सामन्यात का खेळवलं नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. याशिवाय कोहलीला जडेजाऐवजी शार्दुल ठाकूरलाही संधी देता आली असती. इंग्लंडच्या वातावरणात स्विंग बॉलर असलेला शार्दुल ठाकूरही उपयोगी ठरला असता, तसंच त्याने ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन टेस्टमध्ये आपण बॅटिंगही करू शकतो, हेदेखील दाखवून दिलं. बुमराह ठरला अपयशी टीम इंडियाचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) फायनलमध्ये एकही विकेट मिळू शकली नाही. 2021 हे वर्षच बुमराहसाठी निराशाजनक ठरलं आहे. जसप्रीत बुमराहने 2021 साली 4 मॅचच्या 6 इनिंगमध्ये 105.4 ओव्हर बॉलिंग केली, यात त्याला 7 विकेट मिळाल्या. 84 रनवर 3 विकेट त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहने टेस्ट पदार्पणानंतर पाचव्या इनिंगमध्येच 5 विकेट घेतल्या होत्या, पण यावर्षी त्याला एकदाही एका इनिंगमध्ये 5 विकेट घेता आलेल्या नाहीत. टेल एंडर्सचा तिढा अजूनही कायम फायनलमध्ये टेल एंडर्सचा तिढा पुन्हा एकदा टीम इंडियासाठी अडचणीचा ठरला. पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 135/5 अशी होती, पण टीम साऊदी (Tim Southee) आणि काईल जेमिसन (Kyle Jamieson) या खालच्या क्रमांकाच्या बॅट्समननी 51 रन केले, ज्यामुळे किवी टीमला 32 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली. एकीकडे न्यूझीलंडचे तळाचे बॅट्समनना महत्त्वाचा स्कोअर करता आला, पण भारताचे शेवटचे 4 बॅट्समन फक्त 32 रन करू शकले. यामध्ये अश्विनने 22 रन, इशांत शर्माने 4 रन, मोहम्मद शमीने 4 रन आणि बुमराहच्या शून्य रनचा समावेश आहे. तर दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या शेवटच्या 4 बॅट्समननी फक्त 21 रन केले.
  Published by:Shreyas
  First published: