• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : पाऊस बघून पीटरसनची सटकली, ICC वर साधला निशाणा

WTC Final : पाऊस बघून पीटरसनची सटकली, ICC वर साधला निशाणा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) पावसाने सगळ्यात मोठा अडथळा आणला आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याने तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल इंग्लंडमध्ये खेळवण्याचीच गरज नव्हती असं मत मांडलं आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 22 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) पावसाने सगळ्यात मोठा अडथळा आणला आहे. आतापर्यंतच्या 4 दिवसातले 2 दिवस पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर उरलेल्या 2 दिवसही पूर्ण ओव्हर झाल्या नाहीत. या दोन दिवसात फक्त 140 ओव्हरचा खेळ झाला आहे. इंग्लंडमधल्या साऊथम्पटनच्या या हवामानामुळे दिग्गजांनी आयसीसीवर टीका केली आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याने तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल इंग्लंडमध्ये खेळवण्याचीच गरज नव्हती असं मत मांडलं आहे. 'हे सांगताना मला दु:ख होत आहे, की कोणत्याही महत्त्वाच्या स्पर्धेची फायनल इंग्लंडमध्ये होता कामा नये. फायनलसारखी मॅच दुबईमध्ये झाली पाहिजे. जिकडे हवामानामुळे खेळात अडचणी निर्माण व्हायची शक्यता कमी असते,' असं ट्वीट पीटरसनने केलं आहे. 'जर मला निर्णय घ्यायला सांगितला असता तर मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल दुबईमध्ये खेळवली असती. शानदार स्टेडियम, हवामानही चांगलं राहिल याची गॅरंटी, सरावासाठी सर्वोत्तम सुविधा आणि प्रवासासाठीही उत्कृष्ट जागा, आणि हो स्टेडियमच्या जवळच आयसीसी मुख्यालय आहे,' असं पीटरसन त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही आपल्या हटके अंदाजात आयसीसीवर निशाणा साधला आहे. बॅट्समनलाही टायमिंग मिळालं नाही आणि आयसीसीलाही, असं खोचक ट्वीट सेहवागने केलं. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यानेही आयसीसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 'हे चाहत्यांसाठी दु:खद आहे. मला आयसीसीचे (ICC) नियम योग्य वाटले नाहीत. सगळ्यांनी सगळं काही केलं, तुम्हाला एक चॅम्पियन बघण्याची इच्छा आहे. एवढा वेळ असल्यानंतर 5 दिवस रोज 90 ओव्हरच्या हिशोबाने 450 ओव्हर टाकल्या जातील, अशी अपेक्षा होती. आयसीसीकडूनही माझी तशीच अपेक्षा होती. सगळे जण उत्साहित होते. एक दिवस राखीवही ठेवण्यात आला होता, पण यानंतरही खेळ पूर्ण होईल, असं वाटत नाही,' असं लक्ष्मण म्हणाला. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू शेन बॉण्ड (Shane Bond) यानेही आपण लक्ष्मणच्या मताशी सहमत आहोत, असं सांगितलं आहे. 'दोन्ही टीम विजयासाठी खेळतात. खेळपट्टीवर बॉलर्ससाठी खूप काही होतं, त्यामुळे 3-4 दिवसात आपल्याला निकाल मिळू शकतो. तुम्हाला 450 ओव्हर सर्वोत्कृष्ट क्रिकेट बघायची इच्छा असते,' अशी प्रतिक्रिया बॉण्डने दिली. तसंच संजय बांगर यानेही या मॅचचा निकाल लागणं गरजेचं होतं, असं मत मांडलं. न्यूझीलंडला शेवटच्या इनिंगमध्ये 150-160 रनचं आव्हान मिळालं, तरी चौथ्या इनिंगमध्ये त्यांना कठीण जाईल, असं संजय बांगरला (Sanjay Bangar) वाटतं.
  Published by:Shreyas
  First published: