मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /CWG2022: लक्ष्य एकच... राष्ट्रकुलचं सुवर्णपदक!

CWG2022: लक्ष्य एकच... राष्ट्रकुलचं सुवर्णपदक!

भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान

भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान

CWG2022: साखळी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 3 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाची परतफेड करुन सुवर्णपदक जिंकण्याची संधी आज भारतासमोर आहे. पण त्यासाठी भारताला कांगारुंचं तगडं आव्हान मोडीत काढावं लागेल.

बर्मिंगहॅम, 07 ऑगस्ट: भारतीय महिला क्रिकेट संघ राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आज रात्री हरमनप्रीतची टीम इंडिया ऑस्ट्रलियाविरुद्ध सुवर्णपदकासाठी दोन हात करेल. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 9.30 वाजता सुरु होईल. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं इंग्लंडचा 4 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला 5 विकेट्सनी हरवलं. त्यामुळे टी20 विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आज सुवर्णपदकासाठी लढत होईल.

ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोठं

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकाच गटात होते. साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताच्या तोंडून विजयाचा घास अक्षरश: हिरावून घेतला होता. त्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 3 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाची परतफेड करुन सुवर्णपदक जिंकण्याची संधी आज भारतासमोर आहे. पण त्यासाठी भारताला कांगारुंचं तगडं आव्हान मोडीत काढावं लागेल.

स्मृती मानधना सुपर फॉर्ममध्ये

भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधना सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत चार सामन्यात तिनं दमदार फलंदाजी केली आहे. साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध आणि उपांत्य फेरीच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडविरुद्ध खणखणीत अर्धशतकं झळकावली होती. तिच्या खात्यात सध्या चार सामन्यात 51च्या सरासरीनं सर्वाधिक 153 धावा जमा आहेत.

स्मृतीची राष्ट्रकुल स्पर्धेतली कामगिरी –

24 धावा वि. ऑस्ट्रेलिया

63* धावा वि. पाकिस्तान

5 धावा वि. बार्बाडोस

61 धावा वि. इंग्लंड

त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्येही स्मृतीकडून अशाच कामगिरीची अपेक्षा राहील.

हेही वाचा - CWG 2022: हरमनप्रीतनं घेतला धोनीसारखा निर्णय, आणि चक्क फिरवला सामना

स्नेह राणा, रेणुका सिंग कमाल करणार?

साखळी सामन्यात वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ऑस्ट्रेलियासाठी कर्दनकाळ ठरली होती. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर तिनं कांगारुंची आघाडीची फळी कापून काढली होती. पण त्या सामन्यात रेणुकानं चार विकेट्स घेऊनही भारताला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र फायनलमध्ये तिची कामगिरी भारतासाठी महत्वाची ठरावी.

गेल्या वर्षभरात स्नेह राणाकडे भारतीय महिला क्रिकेट संघातली एक भरवशाची खेळाडू म्हणून पाहिलं जातंय. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ती भारतीय संघासाठी संकटमोचक ठरली होती. त्यामुळे आजही स्नेह राणाच्या कामगिरीकडे भारतीय क्रिकेटरसिकांचं लक्ष असेल.

सुवर्णपदकाचं लक्ष्य

ऑस्ट्रेलियावर मात करुन राष्ट्रकुल क्रिकेटचं सोनं जिंकण्याची संधी भारतीय संघासमोर चालून आली आहे. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोठं असलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. त्यामुळे एजबॅस्टनच्या मैदानात आज सुवर्णपदकाच्या निर्धारानं भारतीय संघ मैदानात उतरेल.

First published:

Tags: Cricket, Cricket news, T20 cricket