मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /CWG 2022: हरमनप्रीतनं घेतला धोनीसारखा निर्णय, आणि चक्क फिरवला सामना

CWG 2022: हरमनप्रीतनं घेतला धोनीसारखा निर्णय, आणि चक्क फिरवला सामना

हरमनप्रीतनं घेतला धोनीसारखा निर्णय

हरमनप्रीतनं घेतला धोनीसारखा निर्णय

CWG2022: 2007 च्या टी20 विश्वचषकात धोनीनं चक्क जोगिंदर शर्माकडे अखेरचं षटक सोपवलं. पण धोनीचा तो निर्णय योग्य ठरला आणि भारतानं सामन्यासह विश्वचषकावरही नाव कोरलं. आजही बर्मिंगहॅममध्ये हरमनप्रीत कौरनं अगदी तसच केलं.

बर्मिंगहॅम, 06 ऑगस्ट: 2007 साली टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला पहिल्यांदा टी20 विश्वचषक जिंकून दिला. तो क्षण आजही प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या लक्षात असावा. पण त्यावेळी धोनीच्या एका निर्णयाचीही जोरदार चर्चा झाली. आणि तो निर्णय होता अखेरच्या षटकात जोगिंदर शर्मा या कमी अनुभवी असलेल्या गोलंदाजाच्या हातात चेंडू सोपवण्याचा. पण धोनीचा तो निर्णय योग्य ठरला आणि भारतानं सामन्यासह विश्वचषकावरही नाव कोरलं. आजही बर्मिंगहॅममध्ये हरमनप्रीत कौरनं अगदी तेच केलं.

इंग्लंडला विजयासाठी एका षटकात 14 धावा हव्या होत्या. मेघना सिंगची दोन आणि स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या रेणुका सिंग ठाकूरचं एक षटक शिल्लक होतं. पण हरमननं चेंडू सोपवला तो स्नेह राणाकडे. स्नेह राणानं त्याआधी 3 षटकात 18 च धावा दिल्या होत्या. पण अखेरच्या निर्णायक षटकात हरमननं ऑफ स्पिनर राणाकडे चेंडू सोपवला. आणि तिनं अप्रतिम गोलंदाजी करुन भारतालं फायनलचं दार उघडून दिलं.

धोनीच्याही एक पाऊल पुढे हरमनप्रीत कौर

धोनी हा टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आहे. त्यानं 72 टी20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलं होतं. पण इंग्लंडविरुद्धच्या आजचा सामना हा हरमनप्रीत कौरसाठी कर्णधार म्हणून 73वा सामना ठरला. त्यामुळे टी20त सर्वात जास्त सामन्यात नेतृत्व करण्याचा धोनीचा विक्रम मोडीत काढला. इतकच नव्हे तर धोनीनं 72 पैकी 42 सामने भारताला जिंकून दिले होते. पण हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघानं आतापर्यंत 45 सामने जिंकले आहेत.

हेही वाचा - Sneh Rana: कोण आहे भारतीय महिला संघाची ‘संकटमोचक’ स्नेह राणा?

राष्ट्रकुलचं सोनं जिंकण्याची संधी

इंग्लंडवर मात केल्यानंतर भारतीय संघासमोर राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचं सुवर्णपदक जिंकण्याची संधी चालून आली आहे. 1998 साली जेव्हा क्रिकेटचा राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आला होता त्यावेळी भारतीय पुरुष संघाची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. अजय जाडेचाच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ त्यावेळी नवव्या स्थानावर राहिला होता. त्यानंतर पुढच्या सहा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश झाला नाही. पण यंदा क्रिकेटला राष्ट्रकुलमध्ये जागा मिळाली. आणि महत्वाचं म्हणजे यावेळी भारतानं आपलं पदक पक्क केलं आहे.

First published:

Tags: MS Dhoni, T20 cricket