बर्मिंगहॅम, 06 ऑगस्ट: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हरमनप्रीत कौरचा भारतीय संघ महिला क्रिकेटच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतानं एजबॅस्टनमध्ये झालेल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा 4 विकेट्सनी पराभव केला. या विजयात सर्वात मोलाचं योगदान दिलं ते ऑफ स्पिनर स्नेह राणानं. स्नेह राणा भारतासाठी पुन्हा एकदा ‘संकटमोचक’ ठरली. तिच्या प्रभावी फिरकीनं इंग्लिश फलंदाजांना वेसण घातली. त्यामुळे भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यतीत कायम राहिला.
पण स्नेह राणानं भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही मार्चमध्ये झालेला महिला वन डे विश्वचषक आणि त्याआधी इंग्लंड दौऱ्यातल्या कसोटीत स्नेह राणाची कामगिरी महत्वाची ठरली होती. पण ही स्नेह राणा नक्की आहे कोण? भारतीय संघात येईपर्यंतचा तिचा प्रवास कसा आहे? त्यामागे एक कहाणी आहे.
उत्तराखंड ते टीम इंडिया... स्नेह राणाचा प्रवास
स्नेह राणाचा आजवरचा प्रवास हा अनेक खाचखळग्यांनी भरलेला आहे. राणा मूळची उत्तराखंडच्या देहरादूनची. देहरादूनमधल्या सिनौला या छोट्याशा गावात एका सर्वसामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला. पण वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीपासूनच तिची आणि क्रिकेटची गट्टी जमली. लहानपणी मुलांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या राणानं हळूहळू या खेळात प्रावीण्य मिळवलं. राणा दहा वर्षांची असताना क्रिकेट प्रशिक्षक नरेंद्र शाह एकदा सिनौला या गावी पोहोचले. तिथे त्यांना ‘एक मुलगी छान क्रिकेट खेळते’ असं कुणीतरी सांगितलं. पण नरेंद्र शाह तिला भेटायला गेले त्यावेळी घाबरली आणि लपून राहिली होती. पण शाह यांनी समजूत घातली आणि तिला मैदानात नेलं. तिचा खेळ पाहून शाह यांनी राणाच्या पालकांना तिला देहरादूनमधील अकादमीत पाठवण्याचा सल्ला दिला.
घरापासून 12 किमी दूर असलेल्या क्रिकेट अकादमीत ती आपल्या वडिलांसोबत जाऊ लागली. आणि हळूहळू तिचा खेळ बहरु लागला. 2014 साली स्नेह राणा भारतीय संघात आली ती तिनं राष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या लक्षवेधी कामगिरीमुळे. 2014 मध्ये राणानं वन डे पदार्पण केलं. पण 2016 साली दुखापत आणि खराब फॉर्ममुळे ती संघाच्या बाहेर गेली. तेही अवघे सात वन डे सामने खेळून.
पाच वर्षानंतर दमदार कमबॅक
पण जून 2021 मध्ये राणानं भारतीय संघात कमबॅक केलं. इंग्लंड दौऱ्यासाठी तिची संघात निवड करण्यात आली. आणि ही निवड तिनं सार्थकी ठरवली. तिच्या 4 विकेट्स आणि दुसऱ्या डावातल्या नाबाद 80 धावांच्या खेळीनं भारतानं ब्रिस्टल कसोटी वाचवली. त्यावेळी स्नेह राणा भारतीय संघाची ‘संकटमोचक’ म्हणून पहिल्यांदा समोर आली. हा दौरा तिच्यासाठी खूप खास ठरला. एक तर तिनं पुन्हा भारतीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं आणि दुसरं म्हणजे आपल्या वडिलांचं पुन्हा भारतीय संघात खेळण्याचं स्वप्नही. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होण्याच्या दोन महिने आधी तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे ज्यावेळी तिला भारताची कसोटी जर्सी मिळाली तेव्हा ती भावूक झाली होती.
हेही वाचा - CWG2022: हरमनप्रीतच्या टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, क्रिकेटमध्ये पदक पक्क
विश्वचषकात पाकविरुद्ध ऑलराऊंड कामगिरी
यंदा न्यूझीलंडमध्ये झालेल्या वन डे विश्वचषकात भारतानं पाकिस्ताविरुद्धचा सामना 107 धावांनी जिंकला. त्या सामन्यातही स्नेह राणाची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली. तिनं ऐन मोक्याच्या क्षणी 53 धावांची खेळी केली. इतकच नव्हे तर सातव्या विकेटसाठी पूजा वस्त्रकारसह 122 धावांची भागीदारी साकारुन भारताला चांगल्या स्थितीतन नेऊन ठेवलं. याच सामन्यात दोन विकेट्स घेऊन ती भारतासाठी पुन्हा संकटमोचक ठरली होती.
फायनलमध्ये राणाकडून मोठ्या अपेक्षा
इंग्लंडवरच्या आजच्या विजयानंतर फायनलमध्येही स्नेह राणाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. सोमवारी राष्ट्रकुल स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेत्या संघासोबत भारताची गाठ पडणार आहे. या सामन्यात स्नेह राणाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Sports, T20 cricket