मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /CWG2022: हरमनप्रीतच्या टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, क्रिकेटमध्ये पदक पक्क

CWG2022: हरमनप्रीतच्या टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, क्रिकेटमध्ये पदक पक्क

स्नेह राणाची फिरकी प्रभावी

स्नेह राणाची फिरकी प्रभावी

CWG2022: इंग्लंडकडून कर्णधार नताली स्कीवरनं 40, डनिएला वॅटनं 35 आणि जोन्सनं 31 धावा करत कडवी झुंज दिली. पण दीप्ती शर्मा आणि स्नेह राणाच्या फिरकीनं त्यांचे विजयाचे मनसुबे उधळून लावले.

बर्मिंगहॅम, 06 ऑगस्ट: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या राष्ट्रकुल क्रिकेटच्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघानं इंग्लंडचा सनसनाटी पराभव केला. या विजयासह भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारताचं राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचं पदक पक्क झालंय. या सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण त्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकात 6 बाद 160 धावाच करु शकला. आणि भारतानं हा सामना अवघ्या 4 धावांनी जिंकला.

स्नेह राणाची फिरकी प्रभावी

भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं एकवेळ सामन्यावर मजबूत पकड घेतली होती. पण स्नेह राणाच्या ऑफ स्पिननं कमाल केली. राणा भारताची सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिनं  आपल्या 4 षटकात 28 धावात दोन विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफूटवर धाडलं. अखेरच्या षटकात इंग्लंडला 14 धावांची गरज होती. अशा परिस्थिती राणानं अचूक गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. दीप्ती शर्मानं 18 धावात एक विकेट घेत तिला सुरेख साथ दिली. इंग्लंडचे तीन फलंदाज रनआऊट झाले.

इंग्लंडकडून कर्णधार नताली स्कीवरनं 40, डनिएला वॅटनं 35 आणि जोन्सनं 31 धावा करत कडवी झुंज दिली. पण दीप्ती आणि स्नेह राणाच्या फिरकीनं त्यांचे विजयाचे मनसुबे उधळून लावले.

हेही वाचा - Ind vs WI: चौथ्या टी20साठी रोहित फिट? बीसीसीआयच्या ट्विटमधून सूचक संकेत

स्मृती मानधनाचं खणखणीत अर्धशतक

त्याआधी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या जोडीनं दमदार सलामी दिली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 47 चेंडूत 76 धावांची भागीदारी साकारली. त्यात एकट्या स्मृतीचा वाटा हा 61 धावांचा होता. स्मृतीनं बर्मिंगहॅमच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत झळकावलेलं हे दुसरं अर्धशतक ठरलं. तिनं 32 चेंडूत 61 धावांची खेळी 8 चौकार आणि 3 षटकारांनी सजवली. याआधी पाकिस्तानविरुद्धही स्मृतीनं अर्धशतकी खेळी साकारली होती.

स्मृती आणि शफाली बाद होताच जेमिमा रॉड्रिग्सनं हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माच्या साथीनं भारतीय डावाला आकार दिला. जेमिमानं 44, हरमननं 20 तर दीप्तीनं 22 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताला 20 षटकात 5 बाद 164 धावांची मजल मारता आली.

First published:

Tags: Cricket, T20 cricket