Home /News /sport /

टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणारा अर्झान नागवासवाला कोण आहे?

टीम इंडियासोबत इंग्लंडला जाणारा अर्झान नागवासवाला कोण आहे?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यातल्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली, पण स्थानिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अर्झान नागवासवाला (Arzan Nagwaswalla) याच्याबद्दल मात्र चाहत्यांना फार माहिती नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यातल्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी अभिमन्यू इश्वरन, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्झान नागवासवाला यांना स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून इंग्लंडला नेण्यात येणार आहे. यातल्या इश्वरन, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा यांना क्रिकेट रसिकांनी आयपीएलमध्ये पाहिलं आहे, पण स्थानिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अर्झान नागवासवाला (Arzan Nagwaswalla) याच्याबद्दल मात्र चाहत्यांना फार माहिती नाही. डावखुरा फास्ट बॉलर असलेला अर्झान नागवासवाला याची टी. नटराजन याच्याऐवजी निवड झाली. टी.नटराजन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, पण दुखापत आणि शस्त्रक्रियेमुळे नटराजनला संधी मिळाली नाही. कोण आहे नागवासवाला? पारशी समाजाचा असलेल्या अर्झान नागवासवालाचा जन्म 17 ऑक्टोबर 1997 साली गुजरातच्या सुरतमध्ये झाला. घरामध्ये क्रिकेटची कोणतीही पार्श्वभूमी नसताना नागवासवालाने लहान वयातच बॉल हातात घेतला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने फेब्रुवारी 2018 साली पदार्पण केलं. गुजरातकडून खेळताना राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात त्याने 8 ओव्हरम्ये 34 रन देऊन 2 विकेट घेतल्या, यामध्ये चेतन बिष्ट आणि आदित्य गरव्हाल यांचा समावेश होता. त्या सामन्यात गुजरातचा अगदी सहज विजय झाला. 2018-19 च्या मोसमात अर्झान प्रकाशझोतात आला जेव्हा त्याने मुंबईविरुद्ध 5 विकेट घेतल्या. अर्झानने मुंबईविरुद्धच्या या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव, अरमान जाफर, आदित्य तरे, धृमील मटकर आणि सिद्धेश लाड यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र अर्झानचं पदार्पण म्हणावं तसं यशस्वी ठरलं नाही. 2018 नोव्हेंबरमध्ये त्याने बडोद्याविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण या सामन्यात दोन इनिंगमध्ये 20 ओव्हर टाकून त्याला फक्त एक विकेट मिळाली. 2019 साली त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून टी-20 क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं. तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात 11 रन देऊन अर्झानने 3 विकेट घेतल्या. मुरली विजय, हरी निशांथ आणि रवी अश्विन या तामिळनाडूच्या महत्त्वाच्या खेळाडूंना अर्झानने आऊट केलं. सुरुवातीच्या करियरमध्ये अर्झानला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही, पण 2019-20 च्या रणजी ट्रॉफीमध्ये तो चमकला. गुजरातकडून खेळताना रणजी ट्रॉफीच्या मोसमात 8 मॅच खेळून अर्झानने तब्बल 41 विकेट घेतल्या, यात त्याने तीनवेळा 5 विकेट आणि एकदा 10 विकेट घेतल्या. यावर्षी विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही अर्झानने त्याचा फॉर्म कायम ठेवला. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अर्झानला 9 विकेट तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये 19 विकेट मिळाल्या. स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या या कामगिरीमुळे निवड समितीने अर्झानवर विश्वास दाखवला आणि त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी स्टॅण्ड बाय खेळाडू म्हणून निवड झाली. 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. यानंतर 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान भारत इंग्लंडविरुद्ध (India vs England) त्यांच्या घरच्या मैदानात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India vs england, New zealand, Team india

    पुढील बातम्या