मुंबई, 4 ऑक्टोबर: ‘शिस्त’ हा क्रिकेट खेळातील महत्त्वाचा घटक आहे. हा गुण प्रत्येक खेळाडूच्या अंगी असला पाहिजे, असं म्हटलं जातं. खेळाडूला शिस्त असेल तर संपूर्ण टीमला याचा फायदा होतो. मात्र, काही खेळाडू शिस्तीचं आणि नियमांचं पालन करत नाहीत. अशा चुका वारंवार झाल्यास टीम मॅनेजमेंटला नाईलाजाने या खेळाडूंवर कारवाई करावी लागते. खेळाडूंना याचा मोठा फटका बसतो. वेस्ट इंडिजचा बॅट्समन शिमरन हेटमायरला नुकतीच याची प्रचिती आली आहे. वेळेत एअरपोर्टवर न पोहचल्यामुळे हेटमायरला टी-20 वर्ल्डकप टीमतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागी शेमार ब्रूक्सला टीममध्ये घेण्यात आलं आहे. येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया येथे आयसीसी टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 16 देशांतील क्रिकेट टीम सहभागी होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक सहभागी देशाने खेळाडूंची निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. वेस्ट इंडिजची क्रिकेट टीमही ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाली आहे. मात्र, या टीममध्ये धडाकेबाज बॅट्समन शिमरन हेटमायरचा समावेश नाही. वेळेचं महत्त्व न पाळल्यामुळे त्याला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं शिक्षा दिली आहे. हेही वाचा: T20 World Cup : बुमराहच्या जागेवर कुणाला मिळणार वर्ल्ड कपचे तिकीट? शिमरन हेटमायर 1 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शनिवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार होता. परंतु, कौटुंबिक कारणास्तव तो जाऊ शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं 3 ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी त्याचं फ्लाईट पुन्हा शेड्युल केलं. मात्र, या वेळीही तो वेळेत एअरपोर्टवर पोहचला नाही. परिणामी, त्याचं फ्लाईट निघून गेलं. त्याच्या या बेजबाबदार वागण्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं त्याला टीममधून बाहेर काढलं आहे. विशेष म्हणजे फ्लाईट रिशेड्युल करण्यापूर्वी आता तो वेळेत नाही आला तर कारवाई केली जाईल, असा इशाराही बोर्डानं त्याला दिला होता.
दरम्यान, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं 14 सप्टेंबर रोजी टी-20 वर्ल्डकपसाठी टीमची निवड केली होती. त्यात शिमरन हेटमायरचा समावेश होता. आता त्याला टीममधून बाहेर काढून शेमार ब्रूक्सला संधी देण्यात आली आहे. या आठवड्याच्या शेवटी शेमार ब्रूक्स ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, अशी माहिती वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं दिली आहे. म्हणजेच टी-20 वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत ब्रुक्स खेळणार नाही. तो मेलबर्नमध्ये होणाऱ्या क्वालिफाईंग राउंडपासून टीमसाठी खेळेल. नियमांचं पालन न केल्यास कोणत्याही खेळाडूवर कारवाई होऊ शकते, हे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं शिमरन हेटमायरवर कारवाई करून दाखवून दिलं आहे.