मुंबई, 12 डिसेंबर : बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जानेवारी महिन्यात होणाऱ्या वनडे सीरिजआधी विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) रोहित शर्माला (Rohit Sharma) टीम इंडियाचं कर्णधार बनवलं आहे. रोहितला वनडे टीमचा कर्णधार केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. विराटने टी-20 फॉरमॅटची कॅप्टन्सी स्वत:च सोडली होती, पण वनडे टीमची कॅप्टन्सी त्याच्याकडून काढून घेण्यात आली, त्यामुळे आता टीममध्ये विराट कोहलीचा रोल नेमका काय असेल? त्याची खेळण्याची पद्धत बदलेल का? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वनडेची कॅप्टन्सी गमावल्यानंतर विराट कोहली आणखी आक्रमक होईल, असा दावा गंभीरने केला आहे.
गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सच्या शो फॉलो द ब्लूजमध्ये बोलत होता. 'विराट कोहली मागच्या दोन वर्षांपासून फॉर्ममध्ये नाही, हे खरं आहे. त्याने मागचं आंतरराष्ट्रीय शतक 2019 साली लगावलं होतं, पण 33 व्या वर्षीही तो सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक आहे. खेळासाठी त्याचं समर्पण, खेळात वारंवार सुधारणा करण्याचे गूण त्याला सगळ्यात वेगळा खेळाडू बनवतात. कर्णधारपद गमावल्यानंतर तो दबावातून मुक्त होईल. ही तीन कारणं त्याला वनडेमध्ये आणखी धोकादायक बनवतील,' असं गंभीर म्हणाला.
'वनडे कॅप्टन्सी गेल्यानंतर विराट दबावातून मुक्त होईल आणि लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये आणखी खुलून खेळेल. तो भारताचा गौरव नक्कीच वाढवेल, याचा मला विश्वास आहे. तो सगळ्या फॉरमॅटमध्ये रन करेल, ज्याचा टीमलाच फायदा होईल,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली.
वनडे टीमचं नेतृत्व गेलं असलं तरी विराट त्याच तीव्रतेने आणि जोशाने मैदानात उतरेल. विराटचा सर्वोत्तम खेळ भारत बघेल, मग ते वनडे असो किंवा टेस्ट. खेळासाठी त्याने इतकी वर्ष जुनून आणि जिद्द दाखवली आहे, ती कुठेच जाणार नाही, मग तो कॅप्टन असो किंवा नसो, असं वक्तव्य गंभीरने केलं.
विराटने 95 वनडेमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं, यातल्या 65 मॅचमध्ये भारताचा विजय झाला, म्हणजेच कोहलीच्या नेतृत्वात भारताने 70 टक्क्यांपेक्षा जास्त विजय मिळवला. विजयी टक्केवारीमध्ये विराट धोनी आणि गांगुलीपेक्षाही पुढे आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने 200 पैकी 110 वनडे जिंकल्या, म्हणजे धोनी कॅप्टन असताना भारताची विजयी टक्केवारीमध्ये 59.52 एवढी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautam gambhir, Rohit sharma, Team india, Virat kohli