दिल्ली, 19 फेब्रुवारी : भारताचा क्रिकेटर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक माईलस्टोन गाठला आहे. त्यानं सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला. विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २५ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली. विराट कोहलीने दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ८वी धाव घेताना विक्रम केला. ती धाव विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतली २५ हजारावी धाव ठरली. विराटने ही कामगिरी ५४९ डावात केली आहे तर सचिनने २५ हजार धावांचा टप्पा ५७७ डावात ओलांडला होता. हेही वाचा : IND VS AUS : ऑस्ट्रेलियाला नमवून सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा विजय! वेगाने २५ हजार धावा करण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५८८ डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजार धावा केल्या होत्या. तर २५ हजार धावा करणारा विराट कोहली सहावा फलंदाज आहे. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, माहेला जयवर्धने आणि जॅक कॅलिस यांनी २५ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १२ हजार ८०९ धावा केल्या आहेत. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या ८ हजार १९० धावा झाल्यात. याशिवाय टी२० क्रिकेटमध्ये त्याने ४००८ धावा केल्या आहेत. विराट टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.