मुंबई, 15 ऑगस्ट: येत्या 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत (UAE) आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. सहा संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे हॉट फेव्हरेट मानले जात आहेत. 2018 नंतर पहिल्यांदाच आशिया चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा ही स्पर्धा टी20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे टी20तले आशियातले टॉप पाच शिलेदार आशिया चषक गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मालिकावीराच्या शर्यतीतल या पाच जणांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातंय.
1 – रोहित शर्मा
2018 सालच्या आशिया चषकात रोहित शर्मानं शिखर धवनपाठोपाठ सर्वाधिक धावा केल्या होत्या. टी20त रोहित सध्या सर्वाधिक धावा करणारा जगातला दुसरा फलंदाज आहे. त्यामुळे दुबई आणि शारजात रोहितची बॅट तळपली तर त्याला कुणीही रोखू शकत नाही.
2- सूर्यकुमार यादव
सध्या टी20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव हे भारताचं नाणं खणखणीत वाजतंय. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यात सूर्यकुमारनं धावांचा रतीब घातलाय. त्यात एका शतकाचाही समावेश आहे. आयपीएलचे दोन मोसम दुबई आणि शारजाच्या मैदानांवर खेळल्यानं तिथला अनुभवही सूर्याच्या गाठीशी आहे.
महत्वाची बाब ही की टी20त सध्या सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया चषकात सूर्याचा फॉर्म असाच कायम राहिला तर त्याच्याकडे बाबर आझमला मागे टाकून टी20त नंबर वन होण्याची संधी आहे. मालिकावीराच्या शर्यतीतही सूर्याचं नाव आघाडीवर आहे.
3 – बाबर आझम
आशिया चषकातल्या टॉप 5 शिलेदारांमध्ये आणखी एक नाव आहे ते पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचं. टी20त बाबर आझम नंबर वनचा फलंदाज आहे. त्यामुळे त्याला रोखणं हे प्रतिस्पर्धी संघासमोरचं प्रमुख आव्हान असेल.
हेही वाचा -Ben Stokes: बेन स्टोक्स न्यूझीलंडकडून खेळणार होता? टेलरच्या आत्मचरित्रात मोठा खुलासा
4 – वानिंदू हसरंगा
गेल्या वर्षभरात श्रीलंकेच्या या युवा खेळाडूनं अनेक फलंदाजांची दांडी गुल केली आहे. हसरंगाच्या फिरकीसमोर भले भले फलंदाज गारद झाले आहेत. आयसीसीच्या टॉप 10 टी20 गोलंदाजांच्या यादीत हसरंगाचा समावेश आहे.
5 – रशिद खान
आशिया चषकात खेळणाऱ्या अफगाणिस्तान संघाला कमी लेखून चालणार नाही. अफगाणिस्ताननं गेल्या काही वर्षात टी20 क्रिकेटमध्ये चांगलाच जम बसवला आहे. या संघाचं प्रमुख अस्त्र आहे ते लेगस्पिनर रशिद खान. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएल आणि जगभरातल्या व्यावसायिक टी20 लीगमध्ये रशिदची फिरकी प्रभावी ठरतेय. त्यामुळे आशिया चषकात रशिद खानच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asia world cup, Rohit sharma, Sports