होबार्ट, 23 ऑक्टोबर : आयसीसी T20 विश्वचषक सुपर-12 च्या तिसऱ्या सामन्यात रविवारी आशिया चषक विजेत्या श्रीलंकेने आर्लंडवर 9 गडी राखून मोठा विजय मिळवला. आयर्लंडने दिलेले 129 धावांचे लक्ष्य श्रीलंकेच्या संघाने 30 चेंडू बाकी असताना 1 गड्याच्या मोबदल्यात सहज गाठले. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने 43 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली. त्याने या खेळीत 5 चौकार आणि 3 शानदार षटकार लगावले. त्याच्याशिवाय चरित अस्लंका 22 चेंडूत 31 धावा करून नाबाद राहिला. श्रीलंकेची एकमेव विकेट धनंजया डी सिल्वाची पडली. त्याने बाद होण्यापूर्वी 25 चेंडूत 31 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी धनंजया आणि कुसल यांच्यात 50 चेंडूत 63 धावांची भागीदारी झाली. आयर्लंडकडून फक्त गॅरेथ डेलानीला यश मिळाले. त्याने 4 षटकात 28 धावा देत धनंजयाची विकेट घेतली. याशिवाय एकाही गोलंदाजाला विकेट मिळवता आली नाही. तत्पूर्वी, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी ठराविक धावांच्या अंतराने विकेट मिळवल्याने आयर्लंडच्या फलंदाजांना शेवटपर्यंत सूर गवसला नाही. त्यांना 8 गड्यांच्या मोबदल्यात 128 धावाच करता आल्या. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर हॅरी टेक्टरने 42 चेंडूंत 45 (दोन चौकार, एक षटकार) सर्वाधिक धावा केल्या, तर पॉल स्टर्लिंगने 25 चेंडूंत (चार चौकार व दोन षटकार) 34 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून महिष तेक्षानाने 19 धावांत 2 आणि वानिंदू हसरंगाने 25 धावांत 2 बळी घेतले. लाहिरू कुमारा, धनंजय डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हे वाचा - कांगारुंवर किवी पडले भारी, 11 वर्षांनी न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियात केली ‘ही’ कमाल लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर आयर्लंडचा कर्णधार अँडी बालबर्नीने लवकर विकेट गमावली. लोकरान टकर (10 धावा) देखील स्वस्तात बाद झाला. आयर्लंडला सुपर 12 च्या टप्प्यात नेण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्टर्लिंगने आक्रमक शैलीत खेळण्यास सुरुवात केली, परंतु भानुका राजपक्षेने डीप एक्स्ट्रा कव्हरवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. कर्टिस केम्पर केवळ चार चेंडूच मैदानावर टिकू शकला, ज्यामुळे आयर्लंडची धावसंख्या चार बाद 60 अशी झाली. हे वाचा - क्रिकेट चाहत्यांसाठी मेलबर्नमधून आली गुड न्यूज, भारत-पाक सामन्यात… टेक्टर आणि जॉर्ज डॉकरेल यांनी पाचव्या विकेटसाठी 41 चेंडूत 47 धावांची भागीदारी केल्याने आयर्लंडने 100 धावांचा टप्पा ओलांडला. डॉकरेल (16 चेंडूत 14) लगेचच बाद झाला. 19 व्या षटकात गॅरेथ डेलाना (09) आणि मार्क एडेअर तीन चेंडूंत बाद झाले, त्यांना हसरंगाने बाद केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.