मेलबर्न, 13 नोव्हेंबर : इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवला आहे. दोन टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंड वेस्ट इंडिजनंतरची दुसरी टीम ठरली आहे. फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला आहे. याआधी इंग्लंडने 2010 साली ऑस्ट्रेलियाला हरवून पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. या सामन्यात पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 137 रन केले. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 19 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून यशस्वीरित्या केला.
इंग्लंडच्या या विजयातून टीम इंडियालाही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
अप्रोच बदलला नाही
इंग्लंडने मागच्या काही काळात वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये एकच आक्रमक अप्रोच दाखवला आहे. विकेट गेल्या तरी टीमचे खेळाडू आक्रमक बॅटिंग करणं सोडत नाहीत. फायनलमध्येही इंग्लंडने तिच रणनीती वापरली. एलेक्स हेल्स पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला, पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने 3 विकेट गमावल्या, पण 6 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोअर 49 रन एवढा होता. टीम इंडियाला मात्र वर्ल्ड कपच्या एकाही सामन्यात पॉवरप्लेमध्ये एकदाही 40 रनचा टप्पा पार करता आला नाही. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने 1 विकेट गमावून 38 रन केल्या होत्या. केएल राहुलची विकेट गेल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारखे दिग्गज खेळाडू खुलून खेळू शकले नाहीत.
कॅप्टनने दिला जोश
इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 18 रन केले. आयर्लंडविरुद्ध बटलर शून्य रनवर आऊट झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे इंग्लंडला नॉकआऊट सामन्यात पोहोचण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध विजय गरजेचा होता. न्यूझीलंडविरुद्ध बटलरने 47 बॉलमध्ये 73 रन करून टीमला विजय मिळवून दिला. सेमी फायनलमध्येही त्याने नाबाद 80 आणि फायनलमध्ये 26 रन केले. दुसरीकडे भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला संपूर्ण स्पर्धेत टीमला चांगली सुरूवात करून देण्यात अपयश आलं.
ऑलराऊंडर्समुळे टीम संतुलित
इंग्लंडकडे बेन स्टोक्स, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यासारखे ऑलराऊंडर्स आहेत. या ऑलराऊंडर्सचा इंग्लंडने योग्य वापर केला. मोईन अलीच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 175 विकेट आहेत, पण सेमी फायनलमध्ये भारतीय टीममध्ये डावखुरा बॅट्समन नसल्यामुळे बटलरने मोईन अलीला बॉलिंगच दिली नाही. लेग स्पिनर आदिल रशीदने सेमी फायनल आणि फायनलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
स्टोक्सने स्पर्धेत 6 विकेट घेतल्या. श्रीलंकेविरुद्ध त्याने नाबाद 42 रन आणि फायनलमध्येही नाबाद 52 रनची महत्त्वाची खेळी केली. दुसरीकडे रवींद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे भारताला त्याची कमतरता जाणवली. हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली, पण अक्षर पटेल पूर्णपणे अपयशी ठरला. ऑफ स्पिनर आर.अश्विनला 6 विकेट मिळाल्या, पण एवढ्या विकेट तर एकट्या बेन स्टोक्सने घेतल्या.
डॉट बॉलचा दबाव
सेमी फायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी 42 डॉट बॉल म्हणजेच 7 ओव्हरमध्ये एकही रन केली नाही. तर फायनलमध्ये इंग्लंडच्या बॉलरनी पाकिस्तानविरुद्ध 48 डॉट बॉल टाकले. सेमी फायनलमध्ये भारतीय बॉलरना एकही विकेट घेता आली नाही. सगळ्या 6 बॉलरनी 7 पेक्षा जास्तच्या इकोनॉमी रेटने रन दिले.
स्थानिक लीग खेळण्याचा फायदा
इंग्लंडचे अनेक खेळाडू ऑस्ट्रेलियाची स्थानिक टी-20 स्पर्धा बिग बॅश लीग खेळतात, त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना मैदानं आणि खेळपट्ट्यांबाबत आधीपासूनच माहिती होती. ऑस्ट्रेलियाची मैदानं मोठी असतात त्यामुळे इकडे फोर-सिक्सऐवजी 2-3 रन धावून काढणंही महत्त्वाचं ठरतं. फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी धावून 61 रन काढले. बीसीसीआय भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही, यामुळे टीमचं नुकसान होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यानेही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: England, T20 world cup, T20 world cup 2022, Team india