मुंबई, 08 मार्च : महिला टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात पराभव झाला असला तरी भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळे महिला संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. आयसीसी आणि बीसीसीआय़चे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीही महिला संघाचे कौतुक केलं आहे. भारतीय संघाचं भविष्य उज्वल असल्याचं म्हणत त्यांनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
साखळी फेरीत एकही सामना न गमावलेल्या भारतीय संघाला फायनलमध्ये मात्र मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. भारताने साखळीतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. पण अंतिम सामन्यात भारताने क्षेत्ररक्षणावेळी केलेल्या चुका महागात पडल्या. गोलंदाजी निष्प्रभ ठऱली तर ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर फलंदाजीही ढेपाळली. त्याच जोरावर ऑस्ट्रेलियानं पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकला.
भारतीय महिला संघाच्या पराभवानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेळाडूंचे कौतुक केलं आहे. ते म्हणाले की, " आपल्या महिला संघाला टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. पण भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. महिला संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. भारतीय संघाचे भविष्य उज्वल आहे. यापुढील वाटचालीसाठी टीम इंडियाला शुभेच्छा."
Our @BCCIWomen cricket team lost the #INDvAUS #T20WorldCupFinal but #TeamIndia played exceptionally well to reach the finals. They have been performing to the best of their abilities and their future is very bright. Wishing them all the success!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 8, 2020
आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामना भारताने 85 धावांनी गमावला. या पराभवासह पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. तर, ऑस्ट्रेलियानं तब्बल 5 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 99 धावांवर ढेपाळला.
अंतिम सामन्यात भारताला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियानं 184 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. शेफाली वर्मा फक्त दोन धावांवर बाद झाली. संपूर्ण स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या शेफाली वर्मावरच भारतीय फलंदाजीची मदार होती. त्यानंतर तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट झाली तर जेमिमाह शून्यावर बाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 8 अशी झाली. त्यानंतर स्मृती मानधनाही 11 धावांवर झेलबाद झाली.
भारताला सगळ्यात जास्त अपेक्षा असलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरला या सामन्यातही चांगली कामगिरी करता आली नाही. हरमनप्रीत कौर 4 धावांवर बाद झाली आहे. हरमन बाद झाल्यानंतर वेदा कृष्णामुर्ती आणि दीप्ती शर्मा यांनी काही अंशी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र जोनासनने जबरदस्त कॅच घेत वेदा कृष्णामुर्तीला 16 धावांवर बाद केले. त्यानंतर दीप्ति शर्माने 33 धावांची खेळी करत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र निकोला कॅरीने शर्माला बाद करत भारताला आणखी एक झटका दिला. दीप्ति शर्मा वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
तत्पूर्वी एलिसा हिलीने शानदार खेळी करत भारतीय गोलंदाजांचे कंबरडे मोडले. एलिसा हिलीने 39 चेंडूत 192.31च्या स्ट्राईक रेटने 5 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 75 धावा केल्या. एलिसा आणि बेथ मूनी यांनी 115 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णय एलिसा आणि बेथ मूनी या सलामीवीरांनी सार्थकी ठरवला.
हे वाचा : पांड्या इज बॅक! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियातून 'या' खेळाडूंना वगळलं
भारताचा फायनलपर्यंतचा प्रवास
या स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी हरवून स्पर्धेचा विजयी शुभारंभ केला होता. त्यानंतर भारताने बांगलादेशचा 18 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुध्द टीम इंडियाला 3 धावांचा थरारक विजय मिळाला. शेवटच्या लीग सामन्यात भारताने श्रीलंकेला 7 गडी राखून पराभूत केले. उपांत्य सामन्यात इंग्लंडबरोबरचा सामना होता पण पावसामुळे हा खेळ रद्द करण्यात आला आणि गटातील टप्प्यातील सर्व सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळाले.
पाहा VIDEO : एकटी लढली पण फायनलचा पराभव लागला जिव्हारी, शेफाली मैदानावरच रडली