नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती अर्थात आयसीसीने (ICC) 2024 ते 2031 मध्ये होणाऱ्या आठ मोठ्या स्पर्धांचं आयोजन करणाऱ्या देशांची घोषणा केली आहे. यामध्ये पाकिस्तानला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy 2025 in Pakistan)आयोजन करण्याची जबाबदारी मिळाली आहे. तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानला ही जबाबदारी देण्यात आली दरम्यान, कट्टर प्रतिस्पर्धी असणारी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, खेळ मंत्री अनुराग ठाकुर (Sports Minister Anurag Thakur ) यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करत उपस्थित झालेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले, या निर्णयात गृह मंत्रालयाचा सहभाग असेल
अनुराग ठाकूर म्हणाले, वेळ आल्यावर काय करायचे ते पाहू. या निर्णयात गृह मंत्रालयाचा सहभाग असेल. अलीकडे अनेक देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाण्यापासून माघार घेतली आहे. त्यावेळी पुन्हा सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेऊ." असे मत अनुराग यांनी यावेळी व्यक्त केले आहे. पाकिस्तानसाठी या स्पर्धेचं आयोजन खास आहे, कारण 1996 च्या वर्ल्ड कप फायनलनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा झाल नाही. सुरक्षेच्या कारणास्तव एका दशकापेक्षा जास्त काळापासून पाकिस्तानमध्ये बड्या टीम क्रिकेट खेळण्यासाठी गेल्या नाहीत. 2009 साली श्रीलंकेच्या टीमवर पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला झाला, यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झालं. आता पुन्हा आयसीसीने पाकिस्तानवर विश्वास व्यक्त करत 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचं (Champions Trophy 2025 in Pakistan)आयोजन करण्याची जबाबदारी दिली आहे.
टीम इंडियाकडेही मोठी जबाबदारी
आयसीसीने (ICC) 2024 ते 2031 दरम्यान होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांच्या यजमानांची घोषणा केली आहे. भारताकडे 3 मोठ्या स्पर्धांची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतात 2026 टी-20 वर्ल्डकप, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 वन डे वर्ल्डकप होणार आहे. 2023 चा वन डे वर्ल्डकपही भारतात होणार असल्याची माहिती आहे.