मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

CWG 2022 : भारतीय शटलर्सची कमाल; सिंधू, लक्ष्य सेन फायनलमध्ये

CWG 2022 : भारतीय शटलर्सची कमाल; सिंधू, लक्ष्य सेन फायनलमध्ये

सिंधू, लक्ष्य सेन

सिंधू, लक्ष्य सेन

CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पुरुष आणि महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारतीय शटलर्सनी धडक मारली आहे. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूनं फायनल गाठली आहे. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन उद्या सुवर्णपदकासाठी खेळणार आहे.

  • Published by:  Siddhesh Kanase
बर्मिंगहॅम, 07 ऑगस्ट:  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी दमदार कामगिरी करत महिला आणि पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूनं उपांत्य फेरीत मलेशियाच्या जिया याव मिनवर सलग दोन सेट्समध्ये विजय मिळवत महिला एकेरीची फायनल गाठली. तर लक्ष्य सेननं अटीतटीच्या मुकाबल्यात सिंगापूरच्या जिया हेंग तेचं आव्हान मोडीत काढलं. पण पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात मात्र किदंबी श्रीकांतला मलेशियन प्रतिस्पर्ध्याकडून पराभव स्वीकारावा लागला. सिंधू सलग दुसऱ्या सुवर्णपदकाच्या उंबरठ्यावर 2018च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिंधूनं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सिंधू आता सज्ज झाली आहे. अंतिम फेरीत आता सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल लीसोबत होणार आहे. उद्या सिंधूनं सुवर्णपदक जिंकल्यास तिचं राष्ट्रकुलमधलं सलग दुसरं सुवर्ण तर एकूण तिसरं पदक ठरेल. लक्ष्य सेनची चमकदार कामगिरी लक्ष्य सेननं राष्ट्रकुल स्पर्धेत आपली दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. आणि आता तो बॅडमिंटनचं गोल्डमेडल जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. पण उपांत्य फेरीत त्याला विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. या सामन्यात लक्ष्य सेनसमोर सिंगापूरच्या जिया हेंग तेंगचं कडवं आव्हान होतं. लक्ष्य सेननं पहिला सेट 21-10 अशा फरकानं आरामात जिंकला. पण दुसऱ्या सेटमध्ये हेंग तेनं जोरदार कमबॅक करताना 21-18 अशा फरकानं तो सेट जिंकला. पण अखेर 49 मिनिटं चाललेल्या या लढतीत लक्ष्य सेननं तिसरा सेट 21-17 असा जिंकून पुरुष एकेरीची फायनल गाठली. आता अंतिम सामन्यात लक्ष्य सेनसमोर मलेशियाच्या झी यंगचं आव्हान असेल. हेही वाचा - CWG 2022 : अमित पंघालची सुवर्ण कामगिरी, बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरं गोल्ड श्रीकांतची संधी हुकली पुरुष एकेरीत भारताच्या किदंबी श्रीकांतची अंतिम फेरी गाठण्याची संधी हुकली. मलेशियाच्या झी यंगकडून श्रीकांतला 13-21, 21-19, 21-10 असा पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान या लढतीत श्रीकांतनं पहिला सेट जिंकून आघाडी घेतली होती. पण अखेरच्या दोन्ही सेट्समध्ये मलेशियन शटलरनं श्रीकांतला कमबॅक करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे श्रीकांतला आता कांस्यपदकासाठी उद्या खेळावं लागणार आहे. एकूणच भारतीय बॅडमिंटनसाठी उद्याचा दिवस खास असणार आहे. कारण महिला आणि पुरुष एकेरीच्या सुवर्णपदकावर भारतीय शटलर्स नाव कोरणार का? याकडेच सर्वांचं लक्ष राहील.
First published:

Tags: Badminton, Sport

पुढील बातम्या