बर्मिंगहॅम, 07 ऑगस्ट: कुस्ती आणि वेटलिफ्टिंगनंर राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सर्वाधिक सुवर्णपदकं मिळवून देणारा इव्हेंट म्हणून बॉक्सिंगकडे पाहिलं जातंय. भारतीय बॉक्सर्सनीही आज अंतिम फेरीत सोनेरी यशाला गवसणी घातली. नीतू घंघासपाठोपाठ अमित पंघालनंही गोल्डन पंच लगावला आहे. भारताचं आजच्या दिवसातलं हे दुसरं तर बॉक्सिंगचं दुसरं सुवर्णपदक ठरलं. अमित पंघालनं 51 किलो वजनी गटात इंग्लंडच्या कायरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव केला. अमितचं राष्ट्रकुलमध्ये पहिलं सुवर्ण अमितचं राष्ट्रकुलमधलं हे आजवरचं दुसरं पदक ठरलं. त्यानं गोल्ड कोस्टच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदकाव आपलं नाव कोरलं होतं. पण यंदा त्यानं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं. याशिवाय 2018 च्या जकार्ता एशियाडमध्ये अमितनं सोनेरी कामगिरी बजावली होती. 2019 च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही त्यानं रौप्य पदक पटकावलं होतं. तर आशियाई चॅम्पियनशीपमध्ये 2019 साली सुवर्ण तर 2017 साली कांस्यपदक पटकावलं होतं. हेही वाचा - CWG2022: लक्ष्य एकच… राष्ट्रकुलचं सुवर्णपदक! हरियाणात सेलिब्रेशन अमितच्या या सुवर्ण कामगिरीनंतर हरियाणातील रोहतकमध्ये उत्साह पाहायला मिळाला. अमित हा रोहतकमधील मायना या गावचा. अमितच्या फायनलवेळी त्याच्या गावी लढत पाहण्यासाठी खास सोय करण्यात आली होती. भली मोठी एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. यावेळी अमितच्या घरातल्या मंडळींसह आसपासचे नागरिकही ही लढत पाहण्यासाठी हजर होते. अखेरच्या लढतीदरम्यान काही काळ शांतता होती. तर विजयानंतर टाळ्याही जोरात वाजल्या. अमितचं हे गोल्डन यश त्याच्या गावातील प्रत्येकानं साजरं केलं. अमितनं जेव्हा गोल्ड मेडल जिंकलं तेव्हा गावकऱ्यांनी त्याच्या घरातल्या प्रत्येकाचं अभिनंदन केलं. मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी अमितचे वडील विजेंद्र सिंह यांचा उर भरुन आला होता. आता सर्वांनाच गोल्डन बॉय अमित गावात कधी परतणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. आणि गावात त्याची तयारीही सुरु झाली आहे. अमित गेले अनेक महिने घरापासून दूर आहे. कॉमनवेल्थ आणि इतर स्पर्धांच्या तयारीसाठी तो बराच काळ आपल्या घरच्यांना भेटलेला नाही. त्यामुळे तो आता गावात कधी येणार याची वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.