बर्मिंगहॅम, 08 ऑगस्ट: बर्मिंगहॅममध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंच्या सोनेरी हॅटट्रिकनंतर टेबल टेनिसमध्ये भारताचा दिग्गज खेळाडू शरत कमलनही कमाल केली. टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीत शरथनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. राष्ट्रकुल स्पर्धेत शरथनं पटकावलेलं हे दुसरं वैयक्तिक सुवर्णपदक ठरलं. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शरथनं इंग्लंडच्या लिआम पिचफर्डचा 4-1 असा धुव्वा उडवला.
टेबल टेनिसमध्ये चार सुवर्ण
टेबल टेनिसमध्ये यंदा भारताच्या खात्यात 5 पदकं जमा झाली. त्यात तब्बल चार सुवर्णपदकांचा समावेश होता. आणि या चारपैकी तीन पदक जिंकून देण्यात शरथ कमलनं मोलाचा वाटा उचलला.
राष्ट्रकुलमध्ये शरथचं देदिप्यमान यश
शरथनं 2006 साली पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेतला होता. पहिल्याच प्रयत्नात त्यानं पुरुष एकेरीत सोनेरी कामगिरी केली होती. आणि आज 16 वर्षांनी पुरुष एकेरीत त्यानं पुन्हा सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. शरथच्या झोळीत आजवर राष्ट्रकुलची एक दोन नव्हे तर तब्बल 13 पदकं आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारात 7 सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.
शरथ कमलचा राष्ट्रकुल पदकखजिना –
सुवर्ण – पुरुष एकेरी (2006)
सुवर्ण – सांघिक पुरुष (2006)
सुवर्ण – पुरुष दुहेरी (2010)
सुवर्ण – पुरुष सांघिक (2018)
सुवर्ण - पुरुष एकेरी (2022)
सुवर्ण – मिश्र दुहेरी (2022)
सुवर्ण – सांघिक पुरुष (2022)
हेही वाचा - CWG 2022: लक्ष्य सेनकडून सोनेरी ‘लक्ष्य’ साध्य, भारताला बॅडमिंटनमध्ये दुसरं सुवर्ण
राष्ट्रकुल स्पर्धेतला तिसरा यशस्वी खेळाडू
शरथ कमलला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतला सर्वात यशस्वी खेळाडू मानलं जातं. आपल्या 16 वर्षांत्या कारकीर्दीत त्यानं राष्ट्रकुलमध्ये 13 पदकं जिंकली आहेत. सर्वाधिक राष्ट्रकुल पदकविजेत्या भारतीय खेळाडूंमध्ये शरथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. शरथच्या आधी पहिला क्रमांक लागतो तो नेमबाज जसपाल राणाचा. राणानं राष्ट्रकुल स्पर्धेत 9 सुवर्णपदकांसह तब्बल 15 पदकं पटकावली आहेत. तर समशेरच्या नावावर 7 सुवर्णपदकांसह 14 पदकं आहेत.
युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान
गेली दोन दशकं टेबल टेनिसमध्ये शरथ कमल हे नाव आदरानं घेतलं जातंय. वयाच्या चाळीसाव्या वर्षी शरथच्या खेळातील चपळता वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे अनेक युवा खेळाडूंसाठी शरथ कमल प्रेरणास्थान बनला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.