दुबई, 12 सप्टेंबर: दुबईच्या मैदानात काल आशिया चषकाची फायनल पार पडली. या सामन्यात श्रीलंकेनं पाकिस्तानला 23 धावांनी हरवून सहाव्यांदा आशिया चषक पटकावला. पण या सामन्यात सुरुवातीला पाकिस्ताननं वर्चस्व गाजवलं होतं. सामन्याआधी नाणेफेक जिंकून बाबर आझमनं अर्धी लढाई जिंकली असंही बोललं गेलं. पण अखेर श्रीलंकेनं पाकिस्तानच्या हातून केवळ सामनाच नव्हे तर आशिया चषकही हिसकावून घेतला. पाकिस्तानच्या पराभवाला महत्वाच्या क्षणी सुटलेले झेल कारणीभूत ठरले.
5 बाद 58 वरुन श्रीलंका 170
श्रीलंकेची एकवेळ 5 बाद 58 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मात्र राजपक्षेनं हसरंगा आणि करुणारत्नेच्या साथीनं श्रीलंकेला दीडशेपार नेल. भानुका राजपक्षेनं 45 चेंडूत नाबाद 71 धावा फटकावल्या. या खेळीदरम्यान त्याला दोन वेळा जीवदान मिळालं आणि दोन्ही वेळा पाकिस्तानचा लेग स्पिनर शादाब खाननं राजपक्षेचं कॅच सोडलं. शादाब खानच्या याच चुकीचा पाकिस्तानला मोठा फटका बसला.
शादाब खानकडून माफी
सामन्यानंतर शादाब खाननं ट्विट करत पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि माफीही मागितली. शादाबनं म्हटलंय... ‘कॅचेस विन मॅचेस... मी माफी मागतो आणि या पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वीकारतो. नसीम, रौफ, नवाज यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. पूर्ण संघानं चांगलं प्रदर्शन केलं. पण माझ्यामुळे माझ्या संघाची कामगिरी खालावली. श्रीलंका संघाला विजयाच्या शुभेच्छा!’
Catches win matches. Sorry, I take responsibility for this loss. I let my team down. Positives for team, @iNaseemShah, @HarisRauf14, @mnawaz94 and the entire bowling attack was great. @iMRizwanPak fought hard. The entire team tried their best. Congratulations to Sri Lanka pic.twitter.com/7qPgAalzbt
— Shadab Khan (@76Shadabkhan) September 11, 2022
हेही वाचा - T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा आज? हा धडाकेबाज बॉलर कमबॅक करण्याची शक्यता
171 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेनं पाकिस्तानी फलंदाजीला सुरुवातीपासूनच वेसण घातली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या स्पर्धत पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण रिझवाननं मात्र अर्धशतकी खेळी केली. पण हसरंगा आणि मधुशानच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांचा टिकाव लागू शकला नाही. 19.5 षटकात अख्खा संघ 147 धावात आटोपला. प्रमोद मधुशाननं 4 तर हसरंगानं 3 विकेट्स घेत श्रीलंकेला विक्रमी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.