मुंबई**, 09** ऑगस्ट: गेली दोन दशकं टेनिस विश्वात दबदबा राखणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सनं अखेर थांबण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ती व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे. 40 वर्षांच्या सेरेनानं आज इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत अखेरचं काऊंटडाऊन सुरु झालंय असं म्हटलंय. त्यामुळे आगामी अमेरिकन ओपन ही तिच्या कारकीर्दीतली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा ठरु शकते. सेरेनाची इन्स्टाग्राम पोस्ट सेरेनानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय… “आयुष्यात एक वेळ अशी येते की आपल्याला एका वेगळ्या दिशेनं प्रवास करायचा निर्णय घ्यायचा असतो. तो काळ खूप कठीण असतो कारण तुम्ही एकाद्या गोष्टीवर जीवापाड प्रेम करत असता. मी टेनिसचा भरपूर आनंद लुटते. पण आता उलट मोजणी सुरु झाली आहे. एक आई असलेल्या आणि एका वेगळ्या सेरेनाच्या शोधासाठी लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या काही आठवड्यांचा मी आनंद घेणार आहे.’’ सेरेनाची ही पोस्ट तिच्या निवृत्तीचे स्पष्ट संकेत देत आहे. कारण सप्टेंबर महिन्यात अमेरिक ओपनला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी अमेरिकन ओपन ही सेरेनाच्या कारकीर्दतली अखेरची स्पर्धा ठरु शकते.
ग्रँड स्लॅमची राणी सेरेना विल्यम्सनं आजवरच्या कारकीर्दीत 23 ग्रँड स्लॅम विजेतीपदांवर आपलं नाव कोरलं आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदांमध्ये सेरेना ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. मार्गारेट कोर्टच्या खात्यात सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम विजेतीपदं जमा आहेत. सेरेनाचा ग्रँड स्लॅम विजेतीपदांचा खजिना विम्बल्डन – 7 ऑस्ट्रेलियन ओपन – 7 अमेरिकन ओपन – 6 फ्रेंच ओपन - 3 हेही वाचा - Asia Cup: ‘या’ खेळाडूंना संघात का घेतलं नाही? चाहत्यांचा बीसीसीआयला सवाल आई झाल्यानंतर टेनिस कोर्टवर कमबॅक 2017 सालची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून सेरेनानं टेनिसमधून ब्रेक घेतला होता. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सेरेनानं मुलीला जन्म दिला. आई झाल्यानंतर सेरेना काही काळ टेनिसपासून दूर राहिली. 2018 सालच्या फ्रेंच ओपनमधून सेरेनानं ग्रँड स्लॅम स्पर्धेत कमबॅक केलं. पण त्यानंतर आजपर्यंत तिला एकदाही विजेतेपदावर नाव कोरता आलं नाही. पुनरागमनानंतर तब्बल 4 वेळा ती फायनलमध्ये पोहोचली. पण प्रत्येक वेळी विक्रमी विजेतेपदानं तिला हुलकावणी दिली. आणि मार्गारेट कोर्टशी बरोबरी करण्याचं तिचं स्वप्न अधुरच राहिलं. विक्रमी विजेतेपदानं कारकीर्दीचा एन्ड? मार्गारेट कोर्टच्या विक्रमापासून सेरेना केवळ एक पाऊल दूर आहे. पण तिनं वयाची चाळीशी गाठली आहे. व्यावसायिक टेनिसमध्ये नव्या दमाच्या तरुणी कोर्टवर वर्चस्व गाजवताना दिसतायत. गेल्या दोन ग्रँड स्लॅममध्ये तर सेरेनाला पहिल्याच फेरीतून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे अमेरिकन ओपन जिंकणं ही सेरेनासाठी सहजासहजी शक्य नाही. पण सेरेना जिंकावी आणि तिनं मोठ्या दिमाखात टेनिस कोर्टवरुन निरोप घ्यावा असं प्रत्येक टेनिसरसिकाला वाटत असेल.