मुंबई, 09 ऑगस्ट**:** येत्या 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीत (UAE) आशिया चषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी सोमवारी रात्री बीसीसीआयच्या निवड समितीकडू 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या संघात लोकेश राहुल आणि माजी कर्णधार विराट कोहलीचं पुनरागमन झालं. पण काही खेळाडूंना डावलल्यानं माजी खेळाडूंसह अनेकांनी या निवड प्रक्रियेबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. निवड समितीनं डावललेले प्रमुख खेळाडू मोहम्मद शमी – गेली अनेक वर्ष भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या मोहम्मद शमीचा आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. जसप्रीत बुमरा हा प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर असताना शमीलाही डावलल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. टीम इंडियाचा माजी कसोटीवीर आकाश चोप्रानं तर ‘शमीला संघात घेण्यास निवड समिती विसरली’ असल्याचं म्हटलंय. शमीनं आतापर्यंत चांगली कामगिरी बजावली आहे, त्याची आयपीएल आकडेवारीही चांगली आहे. आवेश खान आणि शमी यापैकी एकाची निवड करायची असेल तर मी नक्की शमीला निवडेन’ असंही आकाश चोप्रा म्हणाला.
Why not mohd shami included if bumrah is injured shami is experienced player where as avesh is trash
— ℛ𝒶𝓀ℯ𝓈𝒽 🐅 (@Spenses01) August 8, 2022
श्रेयस अय्यर – वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या टी20त 64 धावांची दमदार खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरला त्याच्या दुसऱ्याच दिवशी संघातून चक्क बाहेर करण्यात आलं. निवड समितीनं मधल्या फळीत श्रेयसऐवजी दीपक हुडावर विश्वास टाकला. आणि श्रेयसला स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवलं. संजू सॅमसन – टीम इंडियाचा हा युवा यष्टिरक्षक फलंदाज गेली अनेक वर्ष भारतीय संघात ये-जा करत आहे. 2015 साली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या करणाऱ्या संजू सॅमसनन आतापर्यंत केवळ 16 सामनेच खेळले आहेत. गेल्या सात वर्षात नियमितपणे त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. आणि आशिया चषकात तर संघातूनच नव्हे तर स्टँड बाय खेळाडूंमधूनही सॅमसनला वगळण्यात आलं. कुलदीप यादव - युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही रिस्ट स्पिनर्सची जोडी भारतीय संघात असावी असं अनेकांचं मत आहे. आशिया चषकासाठी चहलची निवड झाली. पण चहलसह रवी बिश्नोईच्या रुपात आणखी एका लेग स्पिनरची निवड बीसीसीआयनं केली. त्यामुळे कुलदीप यादवचा पत्ता कट झाला. दीपक चहर – काल निवड झालेल्या भारतीय संघात भुवनेश्वर कुमार हा एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. तर अर्शदीप सिंग आणि आवेश खान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसलेले युवा गोलंदाज आहेत. आशिया चषकासारख्या मोठ्य़ा स्पर्धेत खेळताना दीपक चहरसारखा गोलंदाज संघात हवा होता. पण त्याला निवड समितीनं राखीव खेळाडूंमध्ये ठेवलं आहे. हेही वाचा - Chess Olympiad: टीम इंडियाचा हा हुशार कर्णधार बुद्धिबळ स्पर्धेचा प्रमुख पाहुणा आशिया चषकासाठीचा भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक (विकेट कीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान (स्टँड बाय - अक्षर पटेल, दीपक चहर, श्रेयस अय्यर)