अहमदाबाद, 28 नोव्हेंबर: विजय हजारे ट्रॉफीत आज एक नवा इतिहास घडला. क्रिकेटच्या इतिहासात आजवर एखाद्या बॅट्समननं एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारल्याचं तुम्हाला आठवत असेल. युवराज सिंग, हर्षल गिब्ज, कायरन पोलार्ड ही काही अशी नावं आहेत ज्यांनी मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स ठोकले आहेत. पण आज विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या एका खेळाडूनं तब्बल 7 सिक्सर्स ठोकण्याचा पराक्रम गाजवला आणि या सर्वांचं रेकॉर्ड मोडीत काढलं. बॉलरनं टाकलेल्या एका नो बॉलचा त्यानं फायदा उठवत 7 बॉलमध्ये 7 सिक्स फटकावून एक नवा इतिहास रचला. तो खेळाडू आहे ऋतुराज गायकवाड.
ऋतुराजची ऐतिहासिक खेळी
विजय हजारे करंडकाच्या क्वार्टर फायनलमध्ये आज महाराष्ट्राची गाठ पडली ती उत्तर प्रदेशशी. महाराष्ट्राचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं या सामन्यात तब्बल द्विशतकी खेळी केली. पण 49 व्या ओव्हरमध्ये त्यानं केलेला कारनामा जागतिक रेकॉर्ड बनला. 49 वी ओव्हर घेऊन आलेल्या यूपीचा डावखुरा स्पिनर शिवा सिंगची ऋतुराजनं अक्षरश: लक्तरं काढली. त्यानं प्रत्येक चेंडूवर सिक्सरची नोंद केली. त्यात पाचवा बॉल शिवा सिंगनं नो टाकला. त्यावरही ऋतुराजनं सिक्सर लगावला आणि अख्या ओव्हरमध्ये सात सिक्सर्ससह 43 धावा वसूल केल्या. लिस्ट ए क्रिकेटमधला हा आजवरचा मोठा विक्रम ठरला.
6⃣,6⃣,6⃣,6⃣,6⃣nb,6⃣,6⃣
Ruturaj Gaikwad smashes 4⃣3⃣ runs in one over! 🔥🔥 Follow the match ▶️ https://t.co/cIJsS7QVxK…#MAHvUP | #VijayHazareTrophy | #QF2 | @mastercardindia pic.twitter.com/j0CvsWZeES — BCCI Domestic (@BCCIdomestic) November 28, 2022
हेही वाचा - Virat Kohli: खरंच विराट रिटायर्ड होणार? विराटची 'ती' पोस्ट पाहून चाहत्यांच्या काळजात झालं धस्स!
विक्रमी द्विशतक
या विक्रमी कामगिरीसह ऋतुराजनं या इनिंगमध्ये द्विशतकही साजरं केलं. त्यानं 159 बॉल्समध्ये 10 फोर आणि तब्बल 16 सिक्सर्ससह 220 धावा ठोकल्या. ऋतुराजच्या या इनिंगमुळे महाराष्ट्रानं 50 ओव्हर्समध्ये 5 बाद 330 धावांचा डोंगर उभारला.
हेही वाचा - Cricket: अफगाणिस्तान टीमला मिळालं नवं घर.... पुढची 5 वर्ष अफगाणिस्तानसाठी 'हे' आहे होम ग्राऊंड
विजय हजारे ट्रॉफीत सुपर फॉर्म
यंदाच्या विजय हजारे करंडकातला ऋतुराजचा हा तिसराच सामना होता. या तीन मॅचमध्ये त्यानं दोन शतकांसह तब्बल 384 धावा फटकावल्या आहेत. पहिल्याच मॅचमध्ये त्यान रेल्वेविरुद्ध 124 धावांची नाबाद खेळी केली होती. तर आज उत्तर प्रदेशविरुद्ध क्वार्टर फायनल सामन्यात 220 धावा फटकावल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, Sports