मुंबई, 16 जुलै : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजयानंतर खूपच आनंदी आहे. भारताने डोमिनिका कसोटी सामन्यात यजमान वेस्ट इंडिजला एक डाव आणि १४१ धावांनी हरवून दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तीनच दिवसात संपलेल्या सामन्यानंतर रोहित शर्माने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो वेस्ट इंडिजमधील एका बीचवर फोनवर बोलत असल्याचं दिसतं. हिटमॅनने हा फोटो शेअर करताना मजेशीर कॅप्शन दिला आहे. यावर रोहितला तसंच उत्तर पत्नी रितिकाने कमेंटमध्ये दिलंय. रोहित शर्माने फोटो शेअर करताना म्हटलं की, अनारकलीचा फोन होता, आइस्क्रीम खाणं खूप गरजेचं आहे. रोहितच्या या फोटोवर त्याची पत्नी रितिकाने कमेंट केलीय. रोहित शर्माला ट्रोल करण्याचा तिने प्रयत्न केला. रितिकाने म्हटलं की, पण तू तर माझ्याशी बोलत होतास आणि विचारत होतास कॉफी मशिन ठिक आहे की नाही. रोहितच्या फोटोवर आणि रितिकाच्या कमेंटवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
मेस्सीला रेड लाइट ओलांडणं पडलं असतं महागात; थोडक्यात वाचला, पोलिसांनी केली मदत
रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात शतक झळकावलं. त्याचं कसोटी कारकिर्दीतलं हे दहावं शतक आहे. रोहित शर्माने २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या कसोटीतही रोहितने शतक केलं होतं. त्याने डोमिनिकात खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २२१ चेंडूत १०३ धावा केल्या. पहिल्या कसोटीत भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने एकूण १२ विकेट घेतल्या. यात पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात ७ गडी बाद केले. तर सलामीवीर यशस्वी जैसवाल याने पदार्पणाच्या कसोटीत १७१ धावांची खेळी केली. विराटनेही जबरदस्त फलंदाजी केली. मात्र त्याला शतकाने हुलकावणी दिली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना २० जुलै रोजी पोर्ट ऑफ स्पेन इथं होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







