मुंबई, 07 मार्च : भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लिजंड्सकडून खेळताना तुफान फटकेबाजी केली. सेहवागच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने 7 गडी राखून विंडिज लिजंड्सला पराभूत केलं. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सेहवागने दिग्गजांच्या या सामन्यातही आपली फलंदाजी अजुनही तशीच असल्याचं दाखवून दिलं. सेहवागने फक्त 57 चेंडूत 74 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार मारले. विशेष म्हणजे त्याने डावाची सुरुवात चौकार मारूनच केली. आतापर्यंत सेहवागने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत सलामीवीर म्हणून डावाचा पहिला चेंडू सेहवागने 124 वेळा खेळला आहे. त्यात त्यानं 21 वेळा चौकार मारून सुरुवात केली. मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात सेहवागने त्याच्या जुन्या शैलीत फटकेबाजी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत त्याने पहिल्या गड्यासाठी 83 धावांची भागिदारी केली. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.
And there we go again.
— Marula Siddesh (@ThisIsSiddesh) March 7, 2020
Sehwag starts the innings with 4.
Classic Viru paaji.
Being an opener, he faced the first ball of innings for 124 times while on every 6th occasion, he had hit the first ball for a boundary.
This is the 21st time where he hit 4.#RoadSafetyWorldSeries pic.twitter.com/Cp0miU5INw
रस्ता सुरक्षेसाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. यामध्ये पहिला सामना इंडिया लिजंड विरुद्ध वेस्ट इंडिज लिजंड यांच्यात झाला. विरेंद्र सेहवागच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंडिया लिजंड्सने विंडिजवर 7 गडी राखून विजय मिळवला. विंडिजने दिलेल्या 150 धावांचा पाठलाग करताना इंडिया लिजंड्सच्या सचिन आणि सेहवाग या सलामीच्या जोडीने 83 धावांची भागिदारी केली. त्यानंतर सेहवागने एका बाजुने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यासोबत मोहम्मद कैफने 14 तर युवराज सिंगने नाबाद 10 धावा काढल्या. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 29 चेंडूत 36 धावा केल्या. विंडीजच्या सुलेमन बेनच्या गोलंदाजीवर सचिनचा झेल जेकॉब्सने घेतला. सचिन बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 10.2 षटकांत 83 झाली होती. त्यानंतर भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं. विरेंद्र सेहवागने 11 चौकारांसह 57 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. हे वाचा : धोनीचं ठरलंय! माजी निवड समिती प्रमुखांनी माहीच्या निवृत्तीबद्दल केला खुलासा तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंडिया लिजंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या विंडिज लिजंडने शिवनारायन चंदरपॉलच्या अर्धशतकी आणि डॅरेन गंगाच्या फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या. चंदरपॉलने 41 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. तर डॅरेन गंगाने 24 चेंडूत 32 धावांची वेगवान खेळी केली. यांच्या व्यतिरिक्त ब्रायन लारा 17 धावा, डॅन्झा हॅट 12 धावा तर टिनो बेस्ट 11 धावांवर बाद झाले. इतर खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताकडून गोलंदाजी करताना जहीर खान, मुनाफ पटेल आणि प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर इरफान पठाणने एक गडी बाद केला. जहीर खानने सलामीवीर डॅरेन गंगाला बाद करून विंडीजला पहिला दणका दिला. मुनाफ पटेलनं शिवनारायण चंदरपॉलला बाद करून शेवटच्या षटकांत विंडिजच्या धावांची गती कमी केली. हे वाचा : आफ्रिका दौऱ्यात राहुल होऊ शकतो कर्णधार, विराटच्या फेव्हरेट खेळाडूला मिळणार डच्चू