मुंबई, 11 मार्च : दिग्गज माजी क्रिकेटपटू सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळत आहेत. या स्पर्धेत इंडिया लिजंड्समध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग हे सुद्धा सहभागी झाले आहे. विंडिजविरुद्धचा सामना एकहाती जिंकून देणाऱ्या या जोडीला दुसऱ्या सामन्यात मात्र अपयश आलं. विंडिजविरुद्ध सेहवागने 57 चेंडूत 74 धावांची खेळी केली होती. तर सचिनने 29 चेंडूत 36 धावा काढल्या होत्या. मात्र लंकेविरुद्ध सचिन शून्यावर तर सेहवाग 3 धावांवर बाद झाला.
सचिन-सेहवाग यांची जोडी क्रिकेटशिवाय मैदानाबाहेरही चांगली आहे. पण लंकेविरुद्धच्या सामन्यानंतर सेहवागनं कर्णधार सचिन तेंडुलरकबद्दल नाराजी व्यक्त केली. सचिनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ते योग्य नाही केलं असं सेहवागने म्हटलं आहे.
श्रीलंका लिजंड्स विरुद्धच्या सामन्यानंतर सेहवाग म्हणाला की, पहिल्यांदा क्षेत्ररक्षण केल्यानंतर प्रत्येकाला शारिरीक तक्रारी जाणवल्या. तरीही कर्णधार सचिन तेंडुलकरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यामुळे आम्हाला पूर्ण 20 षटके क्षेत्ररक्षण करावं लागलं आणि फलंदाजी आधीच आम्हाला थकवा आला.
पाहा VIDEO : मास्टर ब्लास्टरची खिलाडूवृत्ती, पंचांनी बाद देण्याआधी सचिनने सोडलं मैदान
इंडिया लिजंड्सने श्रीलंका लिजंड्सविरुद्धचा सामना 5 विकेटने जिंकला. या सामन्यात सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकांत इरफान पठाणने केलेल्या फटकेबाजीमुळे इंडिया लिजंड्सला सामना जिंकता आला. त्याने फक्त 31 चेंडूत 57 धावांची तुफान फटकेबाजी केली. लंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीच्या जोडीला लंकेनं लवकर बाद केलं. यात भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाला. चामिंडा वासच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कलुविथरानाकडे झेल देऊन बाद झाला.
सचिन बाद झाल्यानंतर सेहवागही धावबाद झाला. गेल्या सामन्यात एकहाती सामना जिंकून देणाऱ्या सेहवागने 5 चेंडूत फक्त 3 धावा केल्या. त्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंग चामिंडा वासच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 4.2 षटकांत भारताची अवस्था 3 बाद 19 अशी झाली होती.
हे वाचा :
जागा एक दावेदार 2! रोहितच्या जागी आफ्रिकेविरद्ध विराट कोणाला देणार संधी?
युवराज बाद झाल्यानंतर संजय बांगर आणि मोहम्मद कैफ यांनी डाव सावरला. संजय बांगर रंगना हेराथच्या गोलंदाजीवर पायचित झाला. तर कैफला सेनानायकेनं 46 धावांवर बाद केलं. त्यानंतर इरफान पठाणने तुफान फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप नेलं. त्याला मनप्रीत गोनीने दुसऱ्या बाजुने साथ दिली. कैफ बाद झाला तेव्हा इंडिया लिजंड्सच्या 5 बाद 81 धावा झाल्या होत्या. त्यानंतर इरफान पठाणने 31 चेंडूत 57 धावा केल्या आणि इंंडिया लिजंड्सला दणदणीत विजय मिळवून दिला.
पाहा : VIDEO : मास्टर ब्लास्टरची खिलाडूवृत्ती, पंचांनी बाद देण्याआधी सचिनने सोडलं मैदान मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.