दिल्ली, 19 फेब्रुवारी : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने जिंकून भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या ९ फलंदाजांना बाद करत संघाचा डाव ११३ धावात गुंडाळला. त्यानतंर ११५ धावांचे आव्हान ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारताने कसोटी सामना जिंकला असला तरी पुन्हा एकदा केएल राहुलच्या खराब फॉर्मची चर्चा होत आहेत. भारतीय चाहत्यांनी केएल राहुलवर टीका करताना निवड समितीवर संताप व्यक्त केला आहे. केएल राहुलला दुसऱ्या डावात फक्त एकच धाव करता आली. केएल राहुलच्या फ्लॉप शोमुळे क्रिकेटप्रेमींनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. दिल्ली कसोटीत तिसऱ्या दिवशी केएल राहुल नाथन लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला. केएल राहुलने लायनचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग फिल्डरच्या पॅडवर आदळला आणि विकेटकीपर एलेक्स कॅरीने सोपा झेल घेतला. हेही वाचा : हिटमॅनने 100वी कसोटी खेळणाऱ्या पुजारासाठी केला त्याग, VIDEO VIRAL सामन्यानंतर बोलताना प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुलची पाठराखण केली. केएल राहुलबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल द्रविड म्हणाले की, संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी राहील. आम्हाला केएल राहुलवर पूर्ण विश्वास आहे. असं सर्वांसोबत होत असतं. तो ज्या परिस्थितीतून जातोय तसे सर्वच फलंदाज जातात. आम्ही त्याला सपोर्ट करत राहू. केएल राहुलची परदेशात चांगली कामगिरी झाली आहे. प्रत्येक फलंदाज बॅड पॅचमधून जातो आणि आम्ही जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांना अशा परिस्थितीतून जाताना पाहिलं आहे. केएल राहुलने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्येही धावा केल्या आहेत. जर तुम्ही पाहिलं तर परदेशी खेळपट्टीवर तो आपल्या सर्वात यशस्वी सलामीवीरांपैकी एक आहे असंही राहुल द्रविड यांनी म्हटलं. हेही वाचा : अश्विनची दहशत, स्मिथला घाबरवलं; विराट कोहलीला आवरेना हसू, VIDEO VIRAL केएल राहुलच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना याआधी भारताचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी भारताच्या निवड समितीवर जोरदार निशाणा साधला होता. केएल राहुलला कामगिरीच्या आधारे नाही तर पक्षपातीपणे संघात घेतलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेसुद्धा केएल राहुलबाबत संघ व्यवस्थापनाने विचार करावा असा सल्ला दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.