मुंबई, 18 जानेवारी : टेनिस जगतातील नंबर 2 चा खेळाडू असलेल्या राफेल नदालला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. टेनिसमध्ये सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा सध्या सुरु आहेत. या स्पर्धेचा गतविजेता राहिलेला राफेल नदाल याला दुसऱ्या फेरीत मॅकेन्झी मॅकडोनाल्डकडून पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्ड आणि राफेल नदाल यांच्यात सामना रंगला. परंतु यात मॅकेन्झी मॅकडोनाल्डने नदालचा 6-4, 6-4, 7-5 ने पराभव केला. यासह नदाल स्पर्धेतून बाहेर पडला तर मॅकेन्झी फेरीत प्रवेश मिळवण्यात यशस्वी ठरला.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत 36 वर्षीय नदालला सामन्यादरम्यान पाठीच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. या दुखापतीमुळे त्याला अनेकदा ब्रेक घ्यावा लागला. विश्रांतीनंतर नदाल पुन्हा कोर्टवर परतला होता. मात्र, खेळताना नदालची ती शैली चाहत्यांना दिसून आली नाही आणि त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. रफाएल नदालने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचा खिताब जिंकला होता. गेल्या स्पर्धेत नदालने अंतिम फेरीत डॅनिल मेदवेदेवचा 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनवर आपले नाव कोरले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Sports, Tennis player