मुंबई, 10 जानेवारी : टीम इंडियातून वारंवार बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या पृथ्वी शॉने रणजी सामन्यात कमाल करून दाखवली आहे. मुंबई विरुद्ध आसाम यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात स्टार फलंदाज पृथ्वी शॉने दमदार खेळी करत द्विशतक झळकावले आहे. या द्विशतकासह पृथ्वीने पुन्हा टीम इंडियाचे दार ठोठावले आहे. आसाम विरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळत असलेल्या पृथ्वी शॉने आतापर्यंत 250 चेंडूत 213 धावांची नाबाद खेळी केली आहे. मुंबई विरुद्ध आसाम यांच्यात सुरु असलेल्या सामन्याचा आज पहिला दिवस आहे. या सामन्यात आसामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबई संघाने सुरुवातीच्या 2 विकेट्स गमावून आतापर्यंत 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यात पृथ्वी शॉची तुफान खेळी मुंबई संघासाठी फलदायी ठरली. पृथ्वी शॉ हा या सामन्यात सलामी फलंदाज म्हणून आला. त्याच्यासोबत आलेला सलामीवीर मशीर खान 42 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. हे ही वाचा : गुवाहाटीच्या स्टेडियमवर आता सापांना नो एंट्री! क्रिकेट असोसिएशनने घेतली ‘ही’ दक्षता पृथ्वी शॉने भारतासाठी आतापर्यंत 5 कसोटी सामने, 6 एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांच्या 9 डावात त्याने 42.37 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय पृथ्वीने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.50 च्या सरासरीने 189 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, त्याच्या एकमेव T20 सामन्यात, त्याने फक्त एक चेंडू खेळला, ज्यामध्ये तो खाते उघडू शकला नाही. पृथ्वी शॉ अनेक दिवसांपासून टीम इंडियात पुनरागमनाची संधी शोधत आहे. जुलै 2021 मध्ये पृथ्वीने भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. शॉ भारताकडून 2018 मध्ये त्याने टीम इंडियातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.