मुंबई, १० जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी २० मालिकेनंतर आजपासून श्रीलंका विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. वन डे मालिकेतील पहिला सामना हा आसामच्या गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर खेळवला जात आहे. यासाठी भारतीय संघ सोमवारी गुवाहाटी येथे दाखल झाला असून ही एकदिवसीय मालिका यावर्षी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषकासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. तेव्हा या मालिकेतील सामन्यादरम्यान कोणतेही अडथळे येऊ नये याची दक्षता क्रिकेट असोसिएशनकडून घेण्यात आली आहे.
मागील वर्षी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी २० सामना सुरु असताना गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवरील मैदानात अचानक साप शिरला होता.
भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिकेचा पहिला सामना होत असलेल्या गुवाहाटी क्रिकेट स्टेडियमवर सामन्यादरम्यान येणाऱ्या समस्यांचा इतिहास जुना आहे. गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर सामन्यादरम्यान कधी मैदानात साप आला, तर कधी लाईट गेली तर कधी पावसामुळे ओली झालेली खेळपट्टी ही चक्क इस्त्री आणि हेअर ड्रायरने सुकवावी लागली. मागील वर्षी २ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी २० सामना हा अडथळ्यांमुळे एकदा नाही तर दोनदा थांबवण्यात आला होता. एका चक्क खेळपट्टीवर साप आला होता तर दुसऱ्यावेळेला स्टेडियमची लाईट गेल्याने खेळ थांबवावा लागला. हे ही वाचा : IND VS SL : बुमराहची जागा घेतली ‘या’ खेळाडूने; अशी आहे टीम इंडियाची प्लेयिंग ११ परंतु भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील पहिला सामना हा कोणत्याही अडथळ्याविना पार पडावा याकरता आसाम क्रिकेट असोसिएशनने पूर्ण दक्षता घेतली आहे. मैदानात साप शिरू नये यासाठी रसायनांचा वापर केला गेला आहे. आसाम क्रिकेट अकादमीच्या अध्यक्षा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही संपूर्ण स्टेडियमवर सर्पविरोधी रसायनांची फवारणी केली आहे. डासांना प्रतिबंध करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. सामना सुरु असताना कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी असोसिएशनकडून घेण्यात आली आहे.