नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेननं (Tim Paine) कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. इंग्लंड विरुद्ध पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या प्रतिष्ठेच्या अॅशेस सीरिजपूर्वी त्यानं ही घोषणा केली आहे. टीम पेननंनंतर आता कॅप्टनसीची धुरा कोणाच्या हातात देणार याची चर्चा क्रिकेट जगतात सुरु झाली आहे. नव्या कॅप्टनसीच्या रेसमध्ये पॅट कमिन्सचे ( Pat Cummins) नाव आघाडीवर आहे, जो आधीच संघाचा उपकर्णधार आहे. पॅट कमिन्सला कर्णधार बनवल्यास 65 वर्षांत पहिल्यांदाच एखादा गोलंदाज ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे नेतृत्व करेल. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अॅशेस मालिका होणार आहे. या मालिकेसाठी टीम पेनला ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत 34 कसोटी, 69 एकदिवसीय आणि 37 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कमिन्स कसोटी क्रमवारीतही पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, कमिन्सचे कालचे वक्तव्य व्हायरल होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम फिट नसेल तर मी त्याचा कार्यभार सांभळण्यात तयार असल्याचे म्हटले होते.
म्हणून टीम पेननं दिला राजीनामा
महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज आणि आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरणात टीम पेननं हा राजीनामा दिला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. टीम पेननं पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्याची घोषणा केली. ‘मी आज ऑस्ट्रेलियन टीमची कॅप्टनसी सोडत आहे. हा एक अवघड निर्णय असला तरी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि क्रिकेटसाठी योग्य आहे.’ असे पेननं जाहीर केलं. चार वर्षांपूर्वी महिला कर्मचाऱ्याला पाठवलेल्या अश्लील मेसेज प्रकरणात पेननं हा राजीनामा दिला आहे. त्याचा हा राजीनामा स्विकारण्यात आल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केलं आहे.