मुंबई, 11 डिसेंबर : इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने चांगली पकड मिळवली आहे. इंग्लंडला पहिल्या डावात 281 धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानला 201 धावाच करता आल्या होत्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात 79 धावांची आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या डावात 275 धावा केल्या. यामुळे पाकिस्तानला 355 धावांचे आव्हान मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानच्या 4 बाद 198 धावा झाल्या होत्या. आता विजयासाठी पाकिस्तानला 157 धावांची गरज असून त्यांच्याकडे 6 विकेट हातात आहेत.
पाकिस्तानच्या संघाने पहिल्या डावात पिछाडीवर राहिल्यानंतर सामन्यात पुनरागमन करत इंग्लंडला 275 धावात गुंडाळलं. पहिल्या डावात 7 गडी बाद करून पदार्पण अविस्मरणीय बनवणाऱ्या अबरारने दुसऱ्या डावातही कमाल करत 4 गडी बाद केले. जाहिद महमूदने 3 फलंदाजांना बाद केलं. त्यानंतर 355 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरण्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला. त्यांचा सलामीवीर फलंदाज इमाम उल हक खेळण्यासाठी उपलब्ध नव्हता.
हेही वाचा : ऋषभ पंतने केलेल्या Dream 11च्या जाहिरातीवरून वाद, हंसल मेहता भडकले
इमाम उल हकला हॅमस्ट्रिंगच्या त्रासामुळे स्कॅनिंगसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यामुळे दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी तो मैदानात नव्हता. रुग्णालयातून त्याला सकाळी सोडल्यानंतर तो दुपारी ड्रेसिंग रुममध्ये हजर झाला होता. त्यानतंर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही मैदानात उतरला. तेव्हा पाकिस्तानची अवस्था तीन बाद 83 अशी झाली होती.
हेही वाचा : सेमीफायनलमध्ये मेस्सीच्या खेळण्यावर येऊ शकते बंदी, फिफा कारवाईच्या तयारीत
रुग्णालयातून परत आल्यानंतर मैदानावर उतरलेल्या इमाम उल हकने साउद शकीलच्या साथीने चौथ्या गड्यासाठी शतकी भागिदारी केली. दोघांनी १०८ धावांची भागिदारी केली, यामध्ये इमाम उल हकने 60 धावा केल्या. त्याने 104 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. इमामच्या खेळीमुळे पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केले असून आता त्यांना विजयाची संधी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, England, Pakistan, Test cricket