इस्लामाबाद, 30 नोव्हेंबर : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात १ डिसेंबरपासून रावळपिंडीत ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. त्याआधी इंग्लंडच्या क्रिकेट टीममध्ये एका व्हायरसचा शिरकाव झाला आहे. यामुळे १४ खेळाडुंची प्रकृती बिघडली आहे. कर्णधार बेन स्टोक्स, मोईन अली यांसारख्या खेळाडुंची तब्येत ठीक नाही. ते पहिल्या कसोटीत खेळू शकण्याची परिस्थिती नाही. इंग्लंडचे फक्त ५ खेळाडु असे आहेत जे या व्हायरसपासून वाचले आहेत आणि त्यांची प्रकृती ठीक आहे. यात जॅक क्राउली, किटॉन जेनिंग्स, हॅरी ब्रूक, जो रूट, ऑली पोप यांचा समावेश आहे.
इंग्लंडने एक दिवस आधीच पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या रावळपिंडी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. मंगळवारी त्यांची प्लेइंग इलेव्हनची यादी जाहीर केली होती. यातील ७ खेळाडु आता या व्हायरसच्या तडाख्यात सापडले आहेत. यात बेन डकेट, बेन स्टोक्स, लियाम लिविंगस्टन, बेन फोक्स, ऑली रॉबिन्सन, जॅक लीच, जेम्स अँडरसन यांचा समावेश आहे.
हेही वाचा: ICC ODI Rankings: श्रेयस, संजू आणि शुभमनला झाला फायदा, पाहा कोण कितव्या क्रमांकावर
संघाचे प्रवक्ते डॅनी रेयूबेनने खेळाडुंच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली नाही. तसंच इंग्लंडचे किती खेळाडु अस्वस्थ आहेत हेसुद्धा सांगितलेलं नाही. मात्र एखा वक्तव्यात त्यांनी सांगितलं की, जे खेळाडु अस्वस्थ आहेत त्यांना विश्रांती घेण्यासाठी हॉटेलमध्येच थांबण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा : एक खेळाडु किती सहन करेल? सॅमसनवरून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने BCCIला सुनावलं
स्टोक्सच्या अनुपस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मालिकेच्या ट्रॉफी अनावरणाचा कार्यक्रमही स्थगित केला. आता तो कसोटीसाठी नाणेफेक होण्याच्या आधी केला जाईल. इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आधीच संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अष्टपैलू क्रिकेटर लियाम लिविंगस्टोन पदार्पण करणार आहे. तर बेन डकेट, जॅक क्राउलीसोबत डावाची सुरुवात करेल. मात्र या दोघांचीही तब्येत बिघडली आहे.
इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर इस्लामाबादच्या सेरेना हॉटेलमध्ये उतरली आहे. या दौऱ्यासाठी संघाकडून आवश्यक ती सर्व काळजी घेतली आहे. त्यांनी आपल्यासोबत शेफही आणला आहे. इतकी काळजी घेऊनही त्यांची प्रकृती बिघडली आहे. याआधीही इंग्लंडचा संघ टी२० वर्ल्ड कपआधी पाकिस्तानमध्ये टी२० मालिकेसाठी आला असताना खेळाडुंची तब्येत बिघडली होती. तेव्हा मोईन अलीने खेळाडुंना मिळालेलं जेवण खराब असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच यावेळी इंग्लंडचा संघ शेफ घेऊनच पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ben stokes, Cricket, England, Moeen ali, Pakistan