मुंबई, 16 मार्च : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) 24 वर्षांची कारकीर्द अनेक विक्रमांनी सजलेली आहे. सचिनच्या अनेक विक्रमांपैकी आज सर्वात पहिल्यांदा आठवणारा विक्रम आजच्याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी (16 मार्च 2012) घडला होता. बांगलादेश विरुद्ध झालेल्या झालेल्या वन-डे मध्ये सचिनने 100 वं आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. (Sachin Tendulkar scored his historic 100th international hundred) शतकांचं शतक पूर्ण करणारा सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील एकमेव क्रिकेटपटू आहे. अनेकांनी ज्याचा केवळ स्वप्नात विचार केला असेल ती कामगिरी सचिननं बांगलादेशविरुद्ध प्रत्यक्षात केली होती. एक वर्षांची होती प्रतिक्षा सचिनचं 99 वं आंतरराष्ट्रीय शतक हे 12 मार्च 2011 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये झालं होतं. त्यानंतर प्रत्येक मॅचमध्ये सचिनकडून 100 व्या शतकाची अपेक्षा होती. उर्वरित वर्ल्ड कप आणि त्यानंतर झालेल्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेत सचिनला शतक झळकावता आलं नाही. अनेकदा तो शतकाच्या जवळ आऊट झाला. त्याला हा विक्रम सतत हुलकावणी देत होता. तो सचिनचा दिवस होता! 16 मार्च 2012 हा सचिनचा दिवस होता. त्या दिवशी बांगलादेशनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. गौतम गंभीर (Gautam Gambhir) 11 रन काढून आऊट झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहली (Virat Kohli) बरोबर सचिनची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 147 रनची पार्टरनरशिप केली. कोहलीने 66 रन काढले. कोहली आऊट झाला तेव्हा 36 वी ओव्हर सुरू होती आणि सचिन 87 वर खेळत होता. कोहली कसा आऊट झाला, कोहलीनंतर कोण बॅटींगला येणार याची कुणालाही उत्सुकता नव्हती. सर्वांचं लक्ष हे सचिनच्या 100 व्या शतकाकडे होतं. सचिन सेट झाला होता आणि त्याच्याकडे 100 रन काढण्यासाठी पुरेसा वेळ देखील होता. अखेर तो क्षण आला! सचिन तेंडुलकरनं 1989 साली पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केलं. 1990 साली इंग्लंड विरुद्ध पहिलं शतक झळकावलं. त्याच्या या क्रिकेट करियरमधील एक उंच शिखर सचिनने भारताच्या इनिंगमधील 44 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. शाकिब अल हसनच्या बॉलवर एक रन काढत सचिननं त्याचे शंभरावं शतक झळकावलं. हा पराक्रम करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. ( वाचा : On This Day: लक्ष्मण-द्रविड दिवसभर खेळले आणि बदललं भारतीय क्रिकेट! ) सचिनने 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सचिनने त्याच्या कारकीर्दीत 200 टेस्टमध्ये 51 शतकांसह 15, 921 रन केले आहेत. त्याचबरोबर त्याने 463 वन-डे मध्ये 49 शतकांसह 18, 426 रन केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या दोन प्रकारात सर्वात जास्त रन करण्याचा विक्रम आजही सचिनच्याच नावावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







