मुंबई, 12 जुलै : युरो 2020 (Euro 2020) मध्ये इटलीचा शानदार विजय झाला आहे. फायनलमध्ये इटलीने इंग्लंडचा (England vs Italy) पेनल्टी शूट-आऊटमध्ये 3-2 ने पराभव केला. फुलटाईमपर्यंत मॅचचा स्कोअर 1-1 ने बरोबरीत होता. इटलीने दुसऱ्यांदा युरो कपचा किताब जिंकला. तर दुसरीकडे इंग्लंडला 55 वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. 1966 साली इंग्लंडने शेवटचा फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंडचा फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंचं जुनं दु:ख पुन्हा एकदा समोर आलं आहे. 2019 वनडे वर्ल्ड कप (2019 World Cup) फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा बाऊंड्री काऊंट नियमामुळे पराभव केला होता. मॅच आणि सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर आयसीसीने (ICC) इंग्लंडने जास्त बाऊंड्री मारल्यामुळे त्यांना विजयी घोषित केलं होतं.
Why is it a penalty shootout and not just whoever made the most passes wins? 👀 #joking 😂
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) July 11, 2021
I don't understand.... England had more corners .... they are the champions! #Stillsalty
— Scott Styris (@scottbstyris) July 11, 2021
युरो कपच्या फायनलनंतर न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम (Jimmy Neesham) याने सोशल मीडियावर खिल्ली उडवली. ‘पेनल्टी शूट आऊट का करण्यात आलं? सर्वाधिक पास देणाऱ्या टीमला विजयी घोषित का करण्यात आलं नाही?‘असा सवाल नीशमने उपस्थित केला. तर स्कॉट स्टायरिस (Scott Styris) यानेही टोला हाणला. ‘इंग्लंडने अधिक कॉर्नर केले होते, त्यामुळे ते चॅम्पियन आहेत,’ असं स्टायरिस म्हणाला. इंग्लंडने 2019 साली पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. बाऊंड्री काऊंटच्या नियमामुळे आयसीसीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. यानंतर आयसीसीने नियम बदलला. आता जर सुपर ओव्हरही टाय झाली, तर सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल, असा नियम करण्यात आला आहे.