नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: पाकिस्तान क्रिकेट संघाची गेल्या वर्षभरातली कामगिरी कौतुकास्पद अशी आहे. बाबर आझमच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानच्या संघाने आशिया कपनंतर टी२० वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना खेळला. मैदानावरील कामगिरीशिवाय पाकिस्तानी खेळाडू त्यांच्या आणखी एका गोष्टीसाठी नेहमीच ट्रोल होत असतात. इंग्रजीवरून पाकिस्तानी खेळाडूंना टीकेचा सामना करावा लागतो.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात एक डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. या सामन्यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला जेव्हा इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने म्हटलं की, भाई मला फक्त ३० टक्के इंग्लिश समजतं आणि आता संपलं आहे. यानंतर पूर्ण हॉलमध्ये हास्यकल्लोळ उडाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा : अपमान झाल्यासारखं वाटलं; शूज काढून उभा केल्यानं ग्रँडमास्टर नारायणन भडकला
रावळपिंडीत कसोटीआधी झालेल्या पत्रकार परिषदेत नसीम शाहला एका पत्रकाराने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनवर प्रश्न विचारला. पत्रकाराने विचारलं की, अँडरसन ४० वर्षांचा झालाय आणि तू २० वर्षांचा आहेस. त्याच्या इतक्या दीर्घ कारकिर्दीबाबत तुझा काय विचार आहे. यावर नसीमने म्हटलं की, ही मोठी कामगिरी आहे. कारण मी एक वेगवान गोलंदाज आहे आणि हे किती कठीण आहे हे मला माहिती आहे. अँडरसन खेळातला दिग्गज आहे आणि आम्ही त्याच्याकडून खूप शिकलं आहे. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा याबाबत चर्चा करतो. तो वयाच्या ४० व्या वर्षीही खेळत आहे. तो आताही फिट आहे, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की तो किती कष्ट घेत असेल.
नसीमला एका वेगवान गोलंदाज म्हणून अँडरसनच्या कौशल्यावरून प्रश्न विचारला गेला. इतकंच विचारल्यानंतर नसीमने मधेच पत्रकाराला मधेच थांबवत म्हटलं की, भाई मला फक्त ३० टक्केच इंग्लिश येतं. माझं इंग्लिश आता संपलंय. ओके? (“Brother, I have just 30 percent English. My English is finished now, okay?”) नसीमचं हे असं उत्तर ऐकून तिथे उपस्थित असणाऱ्यांना हसू आवरलं नाही.
हेही वाचा : सॅमसन पुन्हा आऊट की पंतच्या जागी मिळणार संधी? कशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
पत्रकाराने नसीमच्या या उत्तरानंतर तोच प्रश्न थेट आणि स्पष्टपणे विचारला. यावर नसीम म्हणाला की, मी तुम्हाला सांगितलं की तो दिग्गज आहे. त्याला सर्व माहिती आहे आणि त्याला माहितीय की विकेट कशा घ्यायच्या. कारण अँडरसनने पूर्ण जगात क्रिकेट खेळलं आहे. त्यासाठी जगातील दिग्गज गोलंदाजांमध्ये त्याचं नाव आहे. त्याच्याकडे सर्व कौशल्ये आहेत.
इंग्लंड क्रिकेट संघ 17 वर्षांनी कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये टी20 वर्ल्ड कपआधी पाकिस्तानमध्येच 7 टी20 मालिका खेळली गेली होती. या मालिकेत इंग्लंडने विजय मिळवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.