नवी दिल्ली, २९ नोव्हेंबर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 30 नोव्हेंबरला एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि तिसरा सामना होणार आहे. या सामन्यात शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. न्यूझीलंड सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला होता. तर दुसरा सामना पावसामुळे टाय झाला होता. हॅमिल्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात फक्त 12.5 षटकांचा खेळ झाला होता. त्यामुळे आता तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या अकरा खेळाडूंना मैदानात उतरवणार हा प्रश्न आहे.
शिखर धवनने हॅमिल्टनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले होते. संघात सहा गोलंदाज खेळवण्यासाठी त्याने दीपक हुड्डाला संधी दिली होती. मात्र या निर्णयावरून मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. सहावा गोलंदाज खेळवण्याच्या प्रयत्नात पुन्हा एखदा चांगली कामगिरी करत असलेल्या संजू सॅमसनला बाहेर बसवण्यात आले. तर फॉर्ममध्ये नसलेल्या ऋषभ पंतला संघात ठेवलं गेलं. पावसामुळे दीपक हुड्डा ना फलंदाजी करू शकला ना गोलंदाजी.
हेही वाचा : अपमान झाल्यासारखं वाटलं; शूज काढून उभा केल्यानं ग्रँडमास्टर नारायणन भडकला
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार शिखर धवन आणि प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मन प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल करणार आणि कोणाला संघात घेणार हे पाहावं लागेल. एक गोष्ट नक्की आहे की संजू, दीपक किंवा पंत यांच्यापैकी कोण खेळेल त्याच्यावर सर्वांची नजर असेल. सॅमसन जर पंतच्या जागी खेळला तर त्याला मोठी खेळी करून संघाचा विश्वास सार्थ ठरवून मधल्या फळीत दावा भक्कम करावा लागेल. तर हुडाला खेळताना फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवावी लागेल.
संजू सॅमसनने पहिल्या सामन्यात 38 चेंडूत 36 धावा केल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सॅमसनची कामगिरी पाहता त्याने 9 सामन्यात 71 च्या सरासरीने 284 धावा केल्या आहेत. त्याला शतक करता आलं असलं तरी पाच वेळा तो नाबाद राहिला आहे. तसंच यंदाच्या वर्षभरातील ऋषभ पंतची मधल्या फळीतील कामगिरी पाहिली तर 10 सामन्यात 44च्या सरासरीने 308 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. दीपक हुडाने फलंदाजी करताना 9 सामन्यात 28.20 च्या सरासरीने 141 धावा केल्या. तिघांची ही आकडेवारी पाहता सॅमसनचे पारडे पंत आणि दीपकच्या तुलनेत जड आहे.
हेही वाचा : Team India: BCCI चा नवा प्लॅन! टीम इंडियाच्या 3 सिनियर प्लेयर्सची होणार टी20तून कायमची सुट्टी?
तरीही अखेरच्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळणं कठीण वाटत आहे. कारण पंत उपकर्णधार असल्यानं खेळेल. भारतीय संघाची सध्या गोलंदाजीची बाजू कमकुवत आहे. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत हुडा एकमेव असा आहे जो फलंदाजीसह गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
गोलंदाजीतही बदल होऊ शकतात. दीपक चाहर, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह हे तिघे खेळतील. मात्र युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते. तो टी20 मालिकेत संघात होता पण खेळण्याची संधी मिळाली नव्हती. चहल पहिल्या एकदिवसीय सामन्यात महागडा गोलंदाज ठरला होता.
भारताचा संभाव्य संघ: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन/दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल/कुलदीप यादव.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rishabh pant, Sanju samson, Shikhar dhawan, Team india