नवी दिल्ली 23 मार्च : येत्या 16 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी-20 क्रिकेट स्पर्धेचा 16वा सिझन सुरू होत आहे. आयपीएलबाबत असं म्हटलं जातं की, ही स्पर्धा खेळाडूंचं आयुष्य बदलून टाकते. आयपीएलमुळे शेकडो खेळाडू कोट्यधीश बनले आहेत. बंगालचा फास्ट बॉलर मुकेश कुमारचाही आता या यादीत समावेश झाला आहे. मुकेश कुमारला आयपीएल 2023 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सनं 5.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. मुकेश कुमारची बेस प्राईज फक्त 20 लाख रुपये होती. विशेष म्हणजे गेल्या आयपीएल लिलावात मुकेश कुमार अनसोल्ड राहिला होता. या वर्षी मात्र, त्यानं आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक महागडा बंगाली खेळाडू होण्याचा विक्रम केला आहे. त्याला मिळालेल्या किमतीमुळे त्यानं सौरव गांगुलीचाही विक्रम मोडला आहे. सौरव गांगुलीला आयपीएलमध्ये 4 कोटी 37 लाख रुपये किंमत मिळाली होती. मुकेशसाठी भारतीय क्रिकेट टीममध्ये आणि आयपीएलमध्ये प्रवेश करणं सोपं नव्हतं. मुळचे बिहारमधील गोपालगंज येथील रहिवासी असलेले मुकेशचे वडील कोलकात्यात टॅक्सी चालवायचे. आपल्या मुलानं केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्याने तीन वेळा त्यासाठी प्रयत्नही केले पण यश आले नाही. त्यानं अंडर-19 क्रिकेटमध्ये बिहार राज्याचं प्रतिनिधित्वही केलं आहे. IPL 2023 : आयपीएल 2023च्या नियमांत मोठे बदल! संघांना होणार फायदा 2015 मध्ये मुकेशला पश्चिम बंगालच्या वरिष्ठ टीममध्ये संधी मिळाली. बंगालसाठी सातत्यानं प्रभावी फास्ट बॉलिंग केल्याबद्दल त्याला पुरस्कार मिळाला. न्यूझीलंड ‘अ’ टीमविरुद्ध टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय ‘अ’ टीममध्ये त्याची निवड झाली. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये त्यानं 5 विकेट्स घेतल्या होत्या. इराणी ट्रॉफीदरम्यान त्यानं आपल्या पहिल्याच इनिंगमध्ये चार विकेट्स घेतल्या होत्या. आपल्या कामगिरीसाठी मुकेशनं भारतीय ‘अ’ टीमचे कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे आभार मानले आहेत. ते एकेकाळी बंगालचे बॅटिंग कन्सल्टंटही होते. मुकेश म्हणतो की, लक्ष्मणनं वेळोवेळी दिलेल्या सुचनांचा त्याला फार फायदा झाला.
मुकेश शिवपूर क्रिकेट क्लबमध्ये खेळायचा. त्याने 30 ऑक्टोबर रोजी 2015-16 रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 13 डिसेंबर 2015 रोजी लिस्ट ‘अ’ क्रिकेटमध्ये पदार्पण केले तर 2015-16 मध्ये तो आपली पहिली विजय हजारे ट्रॉफी खेळला.
मुकेशनं 6 जानेवारी 2016 रोजी 2015-16 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या माध्यमातून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. डिसेंबर 2022 मध्ये, श्रीलंकेविरुद्धच्या इंटरनॅशनल टी-20 सीरिजसाठी त्याला टीम इंडियामध्ये पहिला कॉल-अप मिळाला. मुकेशच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 34 मॅचमध्ये 130 विकेट्सची नोंद आहे. त्याने सहा वेळा एका डावात पाचपेक्षा जास्त विकेट्स घेतलेल्या आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट टीममधील दिग्गज फास्ट बॉलर असलेला वकार युनूस देखील मुकेश कुमारच्या बॉलिंगचा फॅन आहे.