नवी दिल्ली, 21 जानेवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने टीम इंडियात मधल्या फळीत केल्या जाणाऱ्या प्रयोगांवरून विराट कोहलीला सुनावलं आहे. सेहवागने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, भारताचा लोकेश राहुल टी20 मध्ये पाचव्या क्रमांकावर जर काही वेळा अयशस्वी ठरला तर भारतीय संघ व्यवस्थापन त्याला या क्रमांकावर ठेवणार नाहीत. मात्र, महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दीत असं असतं तर आणखी संधी दिली जात होती.
सेहवाग म्हणाला की, लोकेश राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अपयशी ठरला तर सध्याचे टीम मॅनेजमेंट त्याची जागा बदलण्याचा प्रयत्न करेल. धोनी कर्णधार असताना असं होत नव्हतं. त्याला चांगलं माहिती होतं की, अशा परिस्थितीत खेळाडूंच्या पाठिशी उभा राहणं किती महत्वाचं असतं. कारण तो स्वत: यातून गेला होता.
संघातील खेळाडूंचे धैर्य कमी झाले आहे का असा प्रश्न विचारताच सेहवाग म्हणाला की, धोनी कर्णधार असताना फलंदाजीच्या क्रमवारीत खेळाडूंचे स्थान स्पष्ट होते. त्याला योग्य प्रतिभेची चांगली ओळख होती. धोनीने अशा खेळाडूंना शोधलं ज्यांनी भारतीय क्रिकेटला मोठं केलं. त्याला माहिती होतं कोण सलामीला आणि कोण मधल्या फळीत फिट बसतं. तो स्वत: पाचव्या क्रमांकावर उतरायचा. त्यानंतर केदार जाधव, आणि हार्दिक पांड्या किंवा रविंद्र जडेजा खेळायचे. केएल राहुल 5व्या क्रमांकावर जर सलग चार डावात अपयशी ठरला तर त्याला विराट पुन्हा संधी देण्याची शक्यता दिसणार नाही. धोनीच्या नेतृत्वात असं काही झालं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं.
वाचा : 'ती घटना फक्त रोहितला माहिती', प्रवीण कुमारचा आणखी एक धक्कादायक खुलासा
भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या यशामागे धोनीचा मोठा हात असल्याचं सेहवागने सांगितलं. सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी करणं रोहितला कठिण जायचं. तेव्हा फलंदाजीची संधी मिळेल का? किती षटके खेळायला मिळतील हे माहिती नसायचं. मात्र, सलामीला खेळताना फटकेबाजी करण्याची संधी असायची. त्यामुळे सलामीला आल्याने रोहितला फायदा झाला. धोनीनेच 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माला मधल्या फळीतून सलामीला खेळण्याची संधी दिली होती.
रोहित शर्माने 2013 पर्यंत 108 डावात 36.07 च्या सरासरीने 3 हजार 174 धावा केल्या. यात त्याने 4 शतके आणि 20 अर्धशतके केली होती. त्यानंतर आतापर्यंत रोहित शर्माने 108 डावात 5 हजार 822 धावा केल्या. यात 24 शतके आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.
वाचा : सलमानची स्टाईल मारायला गेला आणि झाला ट्रोल! चहलच्या फोटोवर रोहितची फिरकी