रांची, 09 मे : सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी त्यांची मुलगी झिवा धोनी आणि पत्नी साक्षी धोनी यांच्याबरोबर अधिक वेळ घालवत असतो. धोनी कुटुंबाचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून धोनी त्याच्या चाहत्यांशी कायम जोडलेला असतो. मात्र धोनीला मैदानात खेळताना कधी पाहायला मिळेल याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना नक्कीच आहे. जुलै 2019 पासून धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही आहे. आयपीएलमधून धोनी कमबॅक करेल अशी अपेक्षा सर्वांनाच होती, मात्र लॉकडाऊनमुळे आता ही शक्यता देखील धुसर झाली आहे. लॉकडाऊनमुळे आयपीएल स्थगित करण्यात आले आहे.
दरम्यान सोशल मीडियावर धोनी सध्या सक्रीय आहे. नुकताच त्याचा झिवाबरोबरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. झिवाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये झिवा आणि धोनी त्यांच्या कुत्र्याबरोबर खेळत आहेत. आयपीएल स्थगित करण्यात आल्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जचे सराव सामने देखील होत नाही आहे. त्यामुळे सध्या धोनी रांचीमध्ये आहे. याठिकाणी असणाऱ्या फार्म हाऊसवरील धोनीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये झिवा धोनीचा अल्लडपणा तर आहेच पण आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेणारी आहे, ती म्हणजे धोनीचा लुक.
(हे वाचा-पुण्यातील म्युझियमने खरेदी केली पाक क्रिकेटपटूची बॅट, 'या' कारणासाठी केला लिलाव)
या व्हिडीओमध्ये धोनीचे केस आणि दाढी खूप वाढली आहे. तसंच एका वयस्कर व्यक्तीप्रमाणे धोनीची दाढी पांढरी झाली आहे. परिणामी त्याचा असा बदललेला चेहरामोहरा पाहून धोनीचे फॅन्स काहीसे चिंतेत आहेत.
धोनी गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपनंतर एकदाही क्रिकेटच्या मैदानात दिसलेला नाही. वर्ल्ड कपनंतरच धोनी निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरू होत्या. आयपीएल पुढे गेल्यामुळे आता धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत. याआधी बीसीसीआय़ने त्याला वार्षिक करारातून बाहेर ठेवलं होतं. तर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पहिल्यांदाच म्हटलं होतं की, धोनीचं कमबॅक आयपीएलवर ठरणार आहे. त्याचप्रमाणे, भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाने म्हटलं होतं की, धोनी आता टीम इंडियाची जर्सी घालू शकणार नाही. रमीज राजासोबत युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्राने हे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे धोनी निरोपाचा सामना खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे