मुंबई, 09 ऑगस्ट**:** महेंद्रसिंग धोनी हे भारतीय क्रिकेटमधलं एक मोठं नाव. धोनीनं आपल्या नेतृत्वगुणांच्या जोराव टीम इंडियाला अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. 2007 चा ट्वेन्टी ट्वेन्टी आणि 2011 चा वन डे विश्वचषक ही धोनीची सर्वात मोठी कमाई. मैदानातली धोनीची हुशारी, त्यानं ऐन मोक्याच्या क्षणी घेतलेले अनेक निर्णय आणि त्यामुळे भारतानं मिळवलेला विजय याची अनेक उदाहरणं आहेत. हाच धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता दोन वर्ष उलटली आहेत. पण धोनीची क्रेझ आजही कायम आहे. मैदानावरील आपल्या हुशारीसाठी ओळखला जाणारा धोनी आता चक्क बुद्धिबळाच्या स्पर्धेला पोहोचणार आहे. चेन्नईत सध्या चेस ऑलिम्पियाड सुरु आहे. आणि धोनीला या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदींनी केलं होतं स्पर्धेचं उद्घाटन चेन्नईच्या मामल्लापूर इथं चेस ऑलिम्पियाडचं (Chess Olympiad) आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं यंदाचं 44वं वर्ष आहे. पण महत्वाची बाब ही की बुद्धिबळातील मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेचं भारतात पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. ज्यात जगभरातील अनेक बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला आहे. 28 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. स्पर्धेच्या 11 व्या फेरीसह आज या स्पर्धेचा समारोप होणार आहे. आणि याच समारोपाच्या कार्यक्रमात टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनी प्रमुख पाहुणा असणार आहे. हेही वाचा - David Warner: डेव्हिड वॉर्नरही झाला पी. व्ही. सिंधूचा फॅन, फोटो पोस्ट करुन म्हणाला… दिग्गजांची उपस्थिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. याशिवाय धोनीसह बुद्धिबळातील सर्वोच्च संस्था अर्थात फिडेचे अध्यक्ष आर्कडी ड्वार्कोविच आणि काही दिवसांपूर्वीच उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भारतीय महिला आघाडीवर या स्पर्धेत भारतानं आपले सहा संघ उतरवले आहे. काल झालेल्या दहव्या फेरीनंतर भक्ती कुलकर्णी, कोनेरु ह्म्पी आणि तानिया सचदेव यांनी मिळवलेल्या शानदार विजयामुळे भारत अ संघानं कझाकस्तानवर मात करत महिला गटात आघाडी घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.