बंगळुरू, 02 एप्रिल : आयपीएलच्या १६ व्या हंगामात आज आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएलमधील कर्णधारांच्या फोटोशूटसाठी उपस्थित नव्हता. तब्येत बरी नसल्यानं तो उपस्थित राहू शकला नव्हता असं म्हटलं जात आहे. आता तो पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबद्दल मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी खुलासा केला आहे. मुंबई इंडियन्सचे प्रमुख प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सांगितले की, कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर रविवारी होणाऱ्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त आहेत. त्यांच्या न खेळण्याबाबत असलेल्या सर्व अफवा बाऊचर यांनी फेटाळून लावल्या. TATA IPL 2023 : सर्व सामने मोफत पाहता येणार, डिजिटल पाहण्याचा अनुभव असेल खास शनिवारी पहिल्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बाऊचर यांनी सांगितले की, रोहित तंदुरुस्त आहे. त्याने दोन दिवस सराव केला आणि खेळण्यासाठी तो शंभर टक्के तंदुरुस्त आहे. त्याला सकाळपासून बरं वाटत नव्हतं आणि खबरदारी म्हणून घरीच राहण्यास सांगितलं होतं. खेळाडूंना फोटो शूटही करायचं असतं आणि यातून वेळही मिळत नाही. त्यामुळेच त्याला थोडी विश्रांती दिली होती.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा असेल. तो स्वत: बऱ्याच काळानंतर मैदानावर पुनरागमन करत आहे. मार्क बाऊचर म्हणाले की, जोफ्रा सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्याने सराव केला नाही कारण हा ऑप्शनल सराव होता. तो उद्यासाठी तयार आहे आणि तो खेळेल.

)







