मुंबई, 24 डिसेंबर : फिफा वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाने विजेतेपद पटकावलं. यामध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. मेस्सीचा चाहतावर्ग जगभरात असून भारतातही त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा हेसुद्धा मेस्सीचे चाहते आहेत. नुकतंच मेस्सीने जय शहा यांना एक सरप्राइज दिलं. याचा फोटो आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य आणि माजी खेळाडू प्रज्ञान ओझाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मेस्सीने जय शहा यांना अर्जेंटिनाची जर्सी गिफ्ट केली आहे. यावर मेस्सीने त्याची सहीसुद्धा केली आहे. जय शहा यांच्यासोबत या जर्सीचा फोटो पोस्ट करत प्रज्ञान ओझाने म्हटलं की, GOATने जय भाई यांच्यासाठी आपल्या शुभेच्छा आणि सही असलेली जर्सी पाठवली आहे. आशा आहे की मलासुद्धा माझ्यासाठी एक मिळेल... लवकरच अशी अपेक्षासुद्धा प्रज्ञान ओझाने व्यक्त केली.
View this post on Instagram
लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने या महिन्यात फिफा वर्ल्ड कप 2022 च्या अंतिम सामन्यात फ्रान्सला हरवून 36 वर्षांनी विजेतेपद पटकावलं होतं. अर्जेंटिनाच्या या विजयानंतर जय शहा यांनी अर्जेंटिनाच्या संघाचे अभिनंदन केले होते. जय शहा यांनी म्हटलं होतं की, फुटबॉल किती अविश्वसनीय खेळ आहे. दोन्ही संघांनी असामान्य असा खेळ दाखवला पण अर्जेंटिनाचे तिसऱ्या फिफा वर्ल्ड कप विजेतेपदासाठी अभिनंदन.
हेही वाचा : धोनीनंतर बेन स्टोक्स बनणार कर्णधार? चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओंनी केला खुलासा
अर्जेंटिना वर्ल्ड चॅम्पियन होताच मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. मेस्सीने वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी करताना सात गोल आणि तीन असिस्ट केले. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने गोल्डन बॉल पुरस्कारही जिंकला. यासह मेस्सी एकमेव असा फुटबॉलपटू बनला ज्याने दोन गोल्डन बॉल पुरस्कार पटकावले आहेत. याआधी 2014 मध्येही त्याने गोल्डन बॉल पुरस्कार जिंकला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, FIFA, FIFA World Cup