मुंबई, 27 ऑक्टोबर: क्रेग एर्विनच्या झिम्बाब्वे संघानं वर्ल्ड कपच्या मैदानात गुरुवारी कमाल केली. पाकिस्तानसारख्या बलाढय संघावर झिम्बाब्वेनं सनसनाटी मात करत क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का दिला. खरं तर झिम्बाब्वेनं दिलेलं 131 धावांचं आव्हान पाकिस्तानसाठी कठीण नव्हतंच. पण झिम्बाब्वेची सांघिक खेळी आणि कमालीच्या आत्मविश्वासाच्या जोरावर या संघानं अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली. झिम्बाब्वे गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला जुना लौकिक पुन्हा मिळवताना दिसतेय. पण त्याच्यामागे एका भारतीयाची खास मेहनतही आहे. ते नाव आहे झिम्बाब्वेचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत.
झिम्बाब्वेचं प्रशिक्षकपद आणि राजपूत
2018 साली भारताचे माजी कसोटीवीर लालचंद राजपूत यांनी झिम्बाब्वेचं प्रशिक्षकपद स्वीकारलं. पण त्यावेळी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूतील वाद विकोपाला गेले होते. राजपूत यांनी प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली आणि झिम्बाब्वे-पाकिस्तान ही वन डे मालिका सुरु झाली. पण त्याच्या एक दिवस आधीच राजपूत यांना कळलं की सध्याचा कॅप्टन क्रेग एर्विन, सीन विल्यम्स, सिकंदर रझा, ब्रेंडन टेलर या खेळाडूंनी बोर्डासोबतच्या वादामुळे मालिकेतून माघार घेतली. त्यामुळे कमी अनुभव असलेली टीम घेऊन झिम्बाब्वे त्या मालिकेत उतरली. पहिल्याच मॅचमध्ये 107 आणि तिसऱ्या मॅचमध्ये 67 धावात झिम्बाब्वे ऑल आऊट झाली. त्याचवेळी झिम्बाब्वे संघासाठी काहीतरी करण्याचा राजपूत यांनी निर्णय घेतला.
4 वर्षात परिवर्तन
पुढे 2019 साली झिम्बाब्वे वन डे वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली नाही. पण गेल्या 4 वर्षात झिम्बाब्वे क्रिकेट खूप बदललंय. आणि त्याचा अभिमान असल्याचं राजपूत सांगतात. राजपूत सध्या झिम्बाब्वे क्रिकेटचे टेक्विकल डायरेक्टर आहेत. पात्रता फेरीपर्यंत ते टीमसोबत होते. त्यानंतर कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते भारतात परत आले. पाकिस्तानवरच्या विजयाचा त्यांना खूप आनंद झालाय. राजपूत हे 2007 साली टीम इंडियानं पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा भारतीय संघाचे मॅनेजर होते.
हेही वाचा - T20 World Cup: बरं झालं पाऊस पडला! नाहीतर मॅक्सवेलला करावं लागलं असतं हे काम...
का झाली होती झिम्बाब्वे क्रिकेटची दुर्दशा?
एकेकाळी नील जॉन्सन, अँडी आणि ग्रँट फ्लॉवर, मरे गुडविन, हेन्री ओलंगो, हीथ स्ट्रीक अशा नावाजलेल्या खेळाडूंचा झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये दबदबा होता. पण या खेळाडूंनंतर झिम्बाब्वे मागे पडली. त्यात कमी वेतन आणि इतर अन्य कारणांमुळे झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये वाद निर्माण झाले. त्यात सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीनंही झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डावर निलंबनाची कारवाई केली होती. पण गेल्या काही वर्षात झिम्बाब्वेचं क्रिकेट सुधारत असल्याचं चित्र आहे.
राजपूत यांनी कसा बदल घडवला?
लालचंद राजपूत यांनी झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये मुंबई क्रिकेटमधले गुण रुजवले. एर्विन, विल्यम्स, चकाब्वा यासारख्या सिनियर खेळाडूंशी बोलणी केली. त्यांची मानसिकता बदलली आणि त्याचा फायदाही झाला. राजपूत यांनी एक चांगली टीम तयार केली. जी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा आपलं नाण खणखणीत असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेय.
सिकंदर रझाबाबत काय म्हणतात राजपूत?
सिकंदर रझा हा झिम्बाब्वेचा सध्याचा स्टार फलंदाज आहे. यंदाच्या वर्षात त्यानं तब्बल 5 शतकं ठोकली आहेत. तर बॉलिंगनही कमाल केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयात सिकंदर रझाची भूमिका मोलाची ठरली होती. रझाबद्दल राजपूत म्हणतात... '36 वर्षांचा रझा एक भावूक मुलगा आहे. मी जेव्हा कोच झालो तेव्हा त्याला विचारलं होतं की तू किती मॅचेस झिम्बाब्वेला जिंकून दिल्या आहेस? तेव्हा तो म्हणाला होता की त्यानं मोठी खेळी केलेली नाही. त्यामुळे टीममध्ये त्याची जागाही सुरक्षित नव्हती.' पण आता हाच रझा झिम्बाब्वेचा तारणहार बनला आहे.
राजपूत यांचं झिम्बाब्वेशी नातं कसं जुळलं?
5 वर्षांपूर्वी राजपूत अफगाणिस्तान संघाला ग्रेटर नोएडामध्ये कोचिंग करत होते. पण त्यानंतर काही गोष्टी बदलल्या. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांना काबूलमध्ये येण्याची विनंती केली. पण काबूलमध्ये जाणं राजपूत यांना मान्य नव्हतं. पुढे दबाव वाढत गेला आणि राजपूत यांनी अफगाणिस्तानचं प्रशिक्षकपद सोडलं. त्यानंतर झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे मकॉनी यांचा राजपूत यांना कॉल आला आणि त्यांनी झिम्बाब्वेचं प्रशिक्षकपद स्वीकारण्याची ऑफर दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, T20 cricket, T20 world cup 2022