नवी दिल्ली, 28 जुलै: भारतीय बॉक्सर (Indian Boxer) पूजा राणीने (Pooja Rani) तिच्या ऑलिम्पिक (Olympic) कामगिरीला चांगली सुरुवात केली आहे. ती पहिल्या सामन्यात विजयी ठरली आहे. बुधवारी (28 जुलै) तिने 75 किलो मध्यम वजन गटातल्या राउंड -16 सामन्यात अल्जेरियाच्या इचरक चाइबचा 5-0 असा पराभव केला. पूजा राणीच्या या यशाला तोड नाही. कारण हे यश मिळण्यासाठी तिला खूप खडतर आव्हानांचा सामना करावा लागला. वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी, शारीरिक समस्यांमधून वाट काढत पूजा राणीने हे यश संपादन केलं आहे. एक वेळ अशी होती, की तिचा हात भाजला होता, बॉक्सिंग खेळण्यासाठी कुटुंबातून विरोध होता. तसंच आर्थिक चणचणदेखील होती; मात्र या सर्व अडचणींवर पूजा राणीने मात केली असून, ती अनेक खेळाडूंसाठी प्रेरणा ठरली आहे. पूजा राणीच्या प्रेरक प्रवासाचा आढावा 'आज तक'च्या वृत्तात घेण्यात आला आहे.
हरियाणातलं (Haryana) भिवानी हे 30 वर्षांच्या पूजा राणीचं मूळ गाव. पूजा राणीला बॉक्सिंग (Boxing) करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा अशी वेळ आली होती, की आपलं करिअर संपलं, अशी भिती पूजा राणीला वाटत होती. 'दिवाळीत फटाके पेटवत असताना माझा डावा हात भाजला. त्यातून बरं होण्यासाठी मला सहा महिने लागले. त्यामुळे 2016मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये (Rio Olympic) मी सहभागी होऊ शकले नाही. त्यानंतर 2017मध्ये माझ्या खांद्याला दुखापत झाली. त्या वेळी मला असं वाटत होतं, की आता आपलं करिअर संपलं. मी पुन्हा बॉक्सिंगच्या रिंगणात उतरू शकणार नाही,' अशी आठवण पूजा राणीने एका मुलाखतीत सांगितली होती.
हे वाचा - क्या बात है! Paytm देणार तब्बल 20 हजार अंडर ग्रॅज्युएट्सना नोकरी; सॅलरी बघा
'माझे वडील पोलिस अधिकारी आहेत. मी बॉक्सिंग खेळणं त्यांना अजिबात आवडत नव्हतं. हा खेळ केवळ आक्रमक किंवा चिडखोर व्यक्तींचा आहे, असं त्यांचं म्हणणं होतं,' असं पूजा राणीनं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. या अडचणींसोबत आर्थिक चणचणही होतीच. तरीही तिने बॉक्सिंग खेळणं सोडलं नाही. खेळातल्या सातत्यामुळं आपण इथपर्यंत आल्याचं पूजा राणी सांगते.
पूजा राणीने मार्च 2020 मध्ये झालेल्या आशिया/ओशियाना ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचून टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता. यामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी ती पहिली भारतीय बॉक्सर ठरली. चौथ्या मानांकित पूजाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात थायलंडच्या पोर्निपा चुटीचा 5-0 असा पराभव करत ही कामगिरी केली होती. तथापि, पूजाला या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात चिनी बॉक्सर ली कियानकडून पराभव पत्कारावा लागल्यामुळे तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या सामन्यात विजयी ठरल्याने पूजा राणीचा उपांत्यपूर्व फेरीतला प्रवेश निश्चित झाला असून, ती पदकाच्या अगदी जवळ पोहोचली आहे. पूजा राणी 31 जुलै रोजी चीनची (China) तिसरी रॅंक प्राप्त ली कियानसोबत सामना खेळणार आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकवण्याच्या प्रवासात या चिनी बॉक्सरला पूजाने दोनवेळा पराभूत केलं आहे. 31 जुलैच्या सामन्यात पूजाने ली कियानविरुद्ध विजय नोंदवला, तर तिचं टोकियो ऑलिम्पिकमधलं पदक निश्चित आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boxing champion, Olympics 2021