माउंट माउंगानुई, 02 फेब्रुवारी : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवून मालिकाही 5-0 ने जिंकली. टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या सामन्यात केएल राहुलने 33 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह 45 धावा केल्या. यासह त्याने विराट कोहलीचा एक विक्रम स्वत:च्या नावावर केला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत केएल राहुलने 5 सामन्यात मिळून 224 धावा केल्या. कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत भारतीय फलंदाजाने काढलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.
भारताकडून द्विपक्षीय टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. त्याने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी20 सामन्यात 199 धावा केल्या होत्या. केएल राहुलने 5 सामन्यात जरी या धावा केल्या असल्या तरी द्विपक्षीय मालिकेत त्या सर्वाधिक आहेत.
केएल राहुलनंतर या यादीत विराट आणि पुन्हा केएल राहुल चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचव्या क्रमांकावर हिटमॅन रोहित शर्मा आहे. विराटने विंडिजविरुद्धच्या मालिकेत 183 धावा केल्या होत्या. तर केएल राहुलने विंडिजविरुद्ध 164 धावा केल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माने लंकेविरुद्ध 2017 मध्ये 3 सामन्यात 162 धावा केल्या होत्या.
KL Rahul in this #NZvIND T20I series 👇
— ICC (@ICC) February 2, 2020
56
57*
27
39
45 (today) pic.twitter.com/KZbwh0pCNN
न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 3 बाद 17 अशी झाली होती. त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेफर्टने सावध खेळ करत डाव सावरला. 9 षटकांत न्यूझीलंडच्या 64 धावा झाल्या होत्या. त्यानतंर दहाव्या षटकात सेफर्ट आणि टेलरने शिवम दुबेच्या एका षटकात 34 धावा वसूल केल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. टिम सेफर्टला नवदीप सैनीने बाद केल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत गेले. सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि बुमराह यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझींलडचे तळाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि त्यांचा डाव 156 धावांत संपुष्टात आला.
तत्पूर्वी, सलामीला खेळणाऱ्या रोहित शर्माने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने संजू सॅमसनला सलामीला खेळवलं. मात्र तो फक्त दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. लोकेश राहुलसोबत त्याने डाव सावरला. लोकेश राहुल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक साजरं केलं. पण 60 धावांवर त्याला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. त्यानंतर श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकात फटकेबाजी केल्यानं संघाच्या 20 षटकांत 3 बाद 163 धावा झाल्या. श्रेयस अय्यर 33 धावांवर तर मनिष पांडे 11 धावांवर नाबाद राहिले.
'विराटने पंतसोबत तसं करू नये', सेहवागचा धोनीवर गंभीर आरोप
रोहित शर्माने अर्धशतक साजरं करताना विराटला मागे टाकलं आहे. रोहितचं टी20 मधील हे 25 वे अर्धशतक असून विराट कोहली 24 अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुप्टिलने 17 अर्धशतके केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket