दिल्ली, 02 जानेवारी : ऋषभ पंतच्या अपघातानंतर देश विदेशातील दिग्गज क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऋषभ पंत लवकरात लवकर बरा होवो अशी प्रार्थना अनेकांनी केलीय. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघा चे माजी कर्णधार कपिल देव यांनी म्हटलं की, ऋषभ पंत एक ड्रायव्हर ठेवू शकतो. त्याच्यासारख्या तरुणांना लग्झरी कारचं वेड असतं आणि वेगाकडे लक्ष देत नाहीत. ‘ऋषभ पंत त्याच्यासाठी एक चालक ठेवू शकला असता आणि त्याच्यासोबत झालेली दुर्घटना टाळता आली असती’, असं कपिल देव यांनी म्हटलं. ऋषभ पंतने अपघाताचे कारण एक खड्डा असल्याचं म्हटलं आहे. मात्र, उत्तराखंड पोलिसांनी म्हटलं होतं की, ‘ऋषभ पंत गाडी चालवत असताना त्याला डुलकी लागली.’ या सगळ्या वक्तव्यामध्ये कपिल देव यांनी म्हटलं की, ‘ऋषभ पंतने त्याची स्वत:ची काळजी घ्यायला हवी, कारण त्याच्या समोर अजून बरंच मोठं करिअर आहे.’ हेही वाचा : एका कॅचने क्रिकेट जगतात सुरू झालाय वाद, MCCचा नियम काय सांगतो?
‘हा एक धडा आहे. मी जेव्हा उदयोन्मुख क्रिकेटपटू होतो तेव्हा माझा एका दुचाकी अपघाताचा सामना करावा लागला होता. त्यानंतर माझ्या भावाने मला दुचाकीला हातही लावू दिला नाही. मी देवाचे आभार मानतो की ऋषभ पंत सुरक्षित आहे’, असंही कपिल देव म्हणाले.
कपिल देव यांनी ऋषभ पंतसह इतरांनाही सल्ला दिला असून त्यांनी म्हटलं की, ‘तुमच्याकडे चांगली दिसणारी आणि जबरदस्त वेग असणारी कार आहे पण तुम्हाला सावध रहावं लागेल. तुम्ही सहज ड्रायव्हरचा खर्च करू शकता. एकट्याने गाडी चालवण्याची गरज नाही. मी समजू शकतो की एखाद्या गोष्टीची आवड असणं, वेड असणं अशा वयात स्वाभाविक आहे. पण तुमच्या काही जबाबदाऱ्या असतात. फक्त तुम्हीच तुमची काळजी घेऊ शकता. तुमच्यासाठी काही गोष्टी तुम्हीच ठरवायला हव्यात.’