मुंबई, 15 डिसेंबर : केन विल्यम्सनने न्यूझीलंडच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. न्यूझीलंड क्रिकेटने गुरुवारी याबाबत माहिती देताना सांगितलं की, केन विल्यम्सनने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साउदी याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर टॉम लाथमला उप कर्णधार केलं आहे. केन विल्यम्सन आता फक्त एकदिवसीय आणि टी२० संघाचा कर्णधार असणार आहे.
कर्णधारपद सोडल्यानंतर केन विल्यम्सननेसुद्धा एका निवेदनातून याबाबत माहिती दिली. त्याने म्हटलं की, कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापकांशी चर्चा करून मी हा निर्णय़ घेतला आहे. टीम साउदी न्यूझीलंडचा ३१ वा कर्णधार असणार आहे. साउदीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानला जाणार आहे. न्यूझीलंड पाकिस्तानमध्ये २ कसोटी, २ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. २६ डिसेंबर ते १३ जानेवारीपर्यंत न्यूझीलंड संघाचा दौरा असणार आहे.
हेही वाचा : एक-दोन नव्हे 7 रात्री फुटबॉल मॅचेस बघण्यासाठी जागला! तरुणाची झाली अशी भयावह स्थिती
केन विल्यम्सनने कसोटी संघाचे कर्णधारपद ६ वर्षे सांभाळल्यानंतर पदाचा राजीनामा दिला. त्याने २०१६ मध्ये ब्रेडॉन मॅक्युलमनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. विल्यम्सनने ३८ कसोटीत न्यूझीलंडचे नेतृत्व केले. यात न्यूझीलंडच्या संघाने २२ कसोटी सामने जिंकले. त्याच्याच नेतृत्वाखाली गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला हरवून न्यूझीलंडने विजेतेपद पटकावलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, New zealand