मुंबई, 18 ऑगस्ट: अम्पायर हा क्रिकेटमधला महत्वाचा भाग मानला जातो. सामना सुरु असताना मैदानावरच्या प्रत्येक गोष्टीवर अंपायरचं नियंत्रण असतं. आधुनिक क्रिकेटमध्ये आता टेलिव्हिजन कॅमेरा आणि डीआरएससारख्या तंत्रज्ञानामुळे पंचांवरचा ताण थोडासा हलका झालाय. पण क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका अजूनही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे डोमेस्टिक किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायरिंग करणाऱ्या पंचांना आधी कठीण परीक्षांना सामोरं जावं लागतं. अशा पंचांना ऑन फिल्ड अनुभवासोबतच क्रिकेट नियमांचं ज्ञानही तितकच महत्वाचं असतं.
भारतात बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ क्रिकेट पंचांसाठी दरवर्षी परीक्षा घेतं. लेव्हल वन, लेव्हल टू आणि लेव्हल थ्री अशा कॅटेगरीत या परीक्षा घेतल्या जातात. नुकतीच बीसीसीआयनं क्रिकेट पंचांसाठी लेव्हल टू परीक्षा घेतली होती. आश्चर्याची बाब ही की या परीक्षेत 140 पैकी केवळ तीन जण उत्तीर्ण ठरले.
अंपायर्सना बीसीसीआयच्या प्रश्नांची गुगली
बीसीसीआयच्या या परीक्षेत पंचांची खरोखरच परीक्षा घेणारे आणि त्यांची फिरकी घेणारे अनेक प्रश्न होते. त्यात जवळपास 40 असे प्रश्न होते की ज्यांची उत्तर देताना अनेक अंपायर चुकले. आणि केवळ तीनच पंचांना त्यात यश मिळालं.
पंच परीक्षेतील काही प्रश्न
प्रश्न – बॅट्समन बाऊंड्री लाईनजवळ कॅच आऊट झाला, पण त्याआधी दोन्ही बॅट्समन पहिली धाव घेण्यासाठी एकमेकांना क्रॉस झाले होते. पण तिसऱ्या अम्पायरनं तो नो बॉल असल्याचं सांगितलं. तर आता त्या बॉलवर किती धावा देणार? आणि पुढचा बॉल कोण खेळणार?
उत्तर – नो बॉल + एक धाव, नॉन स्ट्रायकर पुढचा बॉल खेळणार
प्रश्न – बॅट्समननं मारलेला बॉल शॉर्ट लेग फिल्डरच्या हेल्मेटमध्ये अडकला, पण फटक्यासोबत हेल्मेट खाली पडलं आणि फिल्डरनं बॉल जमिनीवर पडण्याआधी कॅच केला. आऊटसाठी अपील करण्यात आलं. तुम्ही काय निर्णय द्याल?
उत्तर – नॉट आऊट
प्रश्न - बॉलर बॉलिंग करणाऱ्या हाताच्या तर्जनीला (Index Finger) दुखापत झाली आहे. त्यानं त्या जागेवर टेप (bandage) लावली आहे. पण ती टेप काढली तर त्यातून रक्त येईल. अशा वेळी तुम्ही बॉलरला बॉलिंग करण्याची परवानगी द्याल?
उत्तर – जर बॉलरला बॉलिंग करायची असेल तर टेप (bandage) काढावीच लागेल.
हेही वाचा - Vinod Kambli: नोकरी देता का नोकरी? टीम इंडियाच्या माजी कसोटीवीराची नोकरीसाठी साद
अंपायर्सची लेव्हल टू परीक्षा
बीसीसीआय़ची लेव्हल वन परीक्षा उत्तीर्ण झालेले अंपायर या परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हे अंपायर्स बीसीसीआयच्या एज ग्रुप क्रिकेट, महिला क्रिकेट आणि ज्युनियर क्रिकेट सामन्यांमध्ये पंचाची भूमिका बजावतात. त्यासाठी ठराविक वेळेत बीसीसीसीआय अशा परीक्षांचं आयोजन करते. देशातल्या अनेक राज्यातल्या क्रिकेट असोसिशनशी संलग्न असलेले अंपायर ही परीक्षा देऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.