मुंबई, 22 मे : आयपीएल 2023 च्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं मुंबईचं स्वप्न जवळपास भंग झालं होतं, पण शुभमन गिल मुंबईच्या मदतीला धावून आला. गुजरात टायटन्सकडून खेळताना शुभमन गिलने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. गिलची ही खेळी विराट कोहलीच्या शतकावरही भारी पडली आणि आरसीबीला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं नाही. या सामन्यात आरसीबीचा विजय झाला असता तर ते मुंबईऐवजी प्ले-ऑफमध्ये पोहोचले असते. शुभमन गिलने आरसीबीविरुद्ध 52 बॉलमध्ये नाबाद 102 रन केले, ज्यामध्ये 5 फोर आणि 8 सिक्सचा समावेश होता. गिलने 200 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. गिलच्या वादळी शतकामुळे मुंबईचं प्ले-ऑफचं तिकीट पक्कं झालं. गिलची बॅटिंग बघून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही खूश झाला आहे. सचिन तेंडुलकरने ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. कॅमरून ग्रीन आणि शुभमन गिलने मुंबई इंडियन्ससाठी चांगली बॅटिंग केली, असं सचिन तेंडुलकर म्हणाला, याचसोबत सचिनने हसण्याची इमोजीही टाकली आहे. हे ट्वीट करताना सचिन विराटची इनिंग विसरला नाही. विराटनंही उत्कृष्ट बॅटिंग करत लागोपाठ दुसरं शतक केलं. मुंबई इंडियन्स प्ले-ऑफला पोहोचल्यामुळे आनंदी आहे, असं सचिन म्हणाला.
.@CameronGreen_ & @ShubmanGill batted well for @mipaltan. 😜
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 21, 2023
Amazing innings by @imVkohli too to score back-to-back 100’s. They all had their methods & were in the class of their own.
So happy to see MI in the playoffs. Go Mumbai. 💙 #AalaRe #MumbaiMeriJaan #IPL2023 pic.twitter.com/D5iYacNEqc
आयपीएल 2023 च्या लीग स्टेजच्या शेवटच्या दोन मॅच रविवारी झाल्या. यातल्या पहिल्या सामन्यात मुंबईकडून कॅमरून ग्रीनने नाबाद शतक करत मुंबईला विजय मिळवून दिला. तर दुसऱ्या सामन्यात विराट आणि गिलचं शतक झालं. आयपीएल लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्यानंतर प्ले-ऑफच्या चार टीम निश्चित झाल्या. गुजरात टायटन्स, सीएसके, लखनऊ आणि मुंबई इंडियन्स या टीम प्ले-ऑफमध्ये पोहोचल्या आहेत. गुजरात आणि सीएसके यांच्यामध्ये पहिला क्वालिफायरचा सामना होणार आहे, या सामन्यात विजय मिळवलेली टीम फायनलमध्ये प्रवेश करेल. तर लखनऊ आणि मुंबई यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यात पराभव झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल, तर जिंकलेली टीम गुजरात आणि चेन्नईमधल्या पराभूत टीमविरुद्ध खेळेल. या सामन्यात जी टीम जिंकेल ते फायनल खेळतील.